कोलकाता : होय, मी पाकिस्तानी आहे. भाजपाला जे करायचंय ते त्यांनी करावं. तुम्हाला कोणी घाबरत नाही. दिल्लीमध्ये बसलेले रंगा-बिल्ला काहीही बोलतील आणि सर्वांना ते मान्य करावं लागेल. नाही केल तर त्यांना देशद्रोही म्हटलं जाईल असं सध्या सुरु आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध करताना चौधरी यांनी कोलकात्यामध्ये भाजपाला लक्ष्य केलं.
पश्चिम बंगालमधील २४ परगनामधील बशीरहाट येथील एका सभेला संबोधित करताना चौधरी यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस सीएए आणि एनआरसीला विरोध करत राहील असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं. भारत देश हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची खासगी मालमत्ता नाही, असा टोलाही चौधरी यांनी आपल्या भाषणामध्ये लगावला. मी पाकिस्तानी आहे असं अनेकदा म्हटलं जातं. आज मी उघडपणे सांगतो की मी पाकिस्तानी आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, असंही चौधरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह यांना अटक झाल्यानंतर पुलवामा हल्ल्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी चौधरी यांनी केली होती. चौधरी यांनी १४ जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये देवेंद्र सिंहचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता.