X Close
X
9819022904

‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ भाजपमध्ये विलीन, मा. खा. निलेश राणेंसह राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश


narayan-rane-and-fadanvis-630x420

कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिका-यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना याआधीच भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकीही मिळाली आहे. मात्र, युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांचा भाजपमधील प्रवेश रखडला होता.

शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. अखेर हा प्रवेश आज झाला. निलेश राणे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो, असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही नारायण राणे यांनी यावेळी केले.

दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षात आलेच होते, राज्यसभेत ते भाजपाचे खासदार आहेत हे मी सगळ्यांना सांगतच होतो. त्यांच्या स्वाभिमान संघटनेचे सगळ्या पदाधिका-यांचा आज भाजपात प्रवेश झाला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मुंबईत हा प्रवेश करायचा नाही तर कणकवलीत हा प्रवेश सोहळा होईल असे मी सांगितलं होते. त्याप्रमाणे आज ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले, यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल यात काहीही शंका नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

(PRAHAAR)