X Close
X
9819022904

‘जगी ज्यास कोणी नाही..’


Mumbai:

श्रीनिवास बेलसरे

संत कबीरदास यांच्या रचना एकेकाळी संपूर्ण भारतात लोकप्रिय होत्या. जवळजवळ सर्वच भारतीय भाषांत त्यांची भाषांतरे झाली होती. विविध भारती, आकाशवाणी मुंबई, पुणे, सांगली, परभणी, औरंगाबाद, जळगाव अशा बहुतेक रेडिओ केंद्रांवर सकाळच्या वेळी भजने लागत. त्यात हमखास कबीरदासजी, संत मीराबाई, संत रोहिदास, संत चोखा महाराज, संत सोहीरा यांची मधुर भक्तिगीते ऐकायला मिळत. प्रसारमाध्यमांचा प्रसार अतिरेकी झालेला नसल्याने घराबाहेर असलो तरी एक ओळ एका घरातून, तर दुसरी ओळ चालता-चालताच दुस-या घरातून ऐकता येई. चालत राहिलो तरी भजनाची, गाण्याची कोणतीही ओळ चुकत नसे.

अर्थात त्या काळी माणसाच्या जीवनात अध्यात्माला महत्त्व होते. शिवाय समाजाने वयानुसारही काही गोष्टी सर्वाच्या आचरणासाठी रूढ केल्या होत्या. सगळेच त्या स्वत:हून पाळत असत. त्यामुळे वयाच्या ५०व्या वर्षानंतर प्रत्येकाने देवाधर्माकडे लागावे, भजना-पूजनात मन रमवावे, धार्मिक तीर्थयात्रा कराव्यात, असे संकेत पाळले जात. रेडिओ, टीव्ही ही माध्यमे समाजाच्या मानसिकतेशी जुळवून घेत असत. त्यासाठी लोकांना काय आवडते, ते बघून कार्यक्रमांची आखणी होई. तोपर्यंत माध्यमांनी कोणताही विधिनिषेध न बाळगता लोकांच्या मनावर प्रभाव पाडून त्यांना हव्या त्या मार्गाला लावणे, हे कार्य अंगीकारलेले नव्हते. एकंदर समाजाचे खूप मोठे प्रबोधन नकळतच होऊन जाई. संत कबिरांचा एक दोहा होता –

‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे,
एक दिन ऐसा आएगा, मै रोंदुगी तोहे।’

या फक्त दोन ओळींवर ज्येष्ठ गीतकार मधुकर जोशी यांनी एक अतिशय सुंदर भक्तिगीत रचले होते. संगीत होते, गोविंद पोवळे यांचे आणि त्यांनीच ते गायलेही होते. त्याचे शब्द एकेकाळी सर्वपरिचित होते –

‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेडय़ा माझ्या पायाशी!’

मधुकरजींनी स्वत:च कबीरदासांच्या केवळ दोन ओळींवर विस्तार करून त्यांचा संदेश मराठी श्रोत्यांसाठी उलट अधिक सुलभ करून टाकला होता.

मला फिरविसी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी कधी असे मी,
कधी शवापाशी!

केवढी प्रभावी कल्पनाशक्ती! कुंभाराने बनविलेला मातीचा एक घट शुभप्रसंगी लग्नमंडपात जातो, तर कधी तो स्मशानात चक्क शवापाशी पडून असतो आणि प्रत्येकाचा शेवट असाच त्या घटातील मातीशी एकरूप होण्यातच आहे. हा गंभीर आशय कवीने फार प्रभावीपणे सांगितला होता. कुंभार माती मळतो आहे, त्यासाठी त्याला ओल्या मातीत चालावे लागते, ती माती सुंदर मडकी घडविण्यासाठी मऊसुत व्हावी म्हणून तिला पायांनी तुडवावे लागते. त्यावेळी ती मातीच त्याच्याशी बोलते आहे, अशी कल्पना संत कबिरांनी केली आणि त्यातून सर्वासाठी जीवनातील एक भयंकर सत्य सांगून टाकले होते. कवी मधुकर जोशी तोच धागा पकडून पुढे म्हणतात –

वीर धुरंधर आले गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती,
अंती मजपाशी!

आणि एकदा हे सत्य गळी उतरविले की, मग ते आपल्याला आपल्या जीवनातील अंतिम वास्तवाची जाणीव करून देताना सांगतात –

गर्वाने का ताठ राहसी
भाग्य कशाला उगा नासशी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले
मीलन माझ्याशी.

म्हणजे, माणूस कितीही यशस्वी असो, बलाढय़ असो, सुंदर असो की, कुरूप असो.. अखेरीस मातीशी मीलन हेच प्रत्येकाचे भवितव्य आहे. रेडिओवरील भक्तिसंगीताच्या कार्यक्रमामुळे एवढा आध्यात्मिक संदेश किती सहजगत्या लोकांच्या मनात नियमितपणे उतरत असे. कदाचित सतत असे उदात्त विचार ऐकल्यामुळे समाजाची नैतिक पातळीही उच्च राहून गुन्हे कमी होत असत का? असे वाटत राहते. आज हे सात्त्विक विचारांचे संवर्धन तर नाहीच, उलट भौतिक सुखसाधनांच्या जाहिरातींचा मारा, कुटीलपणे रचलेल्या खोटय़ा कथामाला आणि वासनांचा नंगानाच यामुळे माणूस जास्त लोभी, जास्त वासनांध, जास्त क्रूर होतोय का? अशीही शंका मनात येत राहते.

त्याकाळी भक्तिगीते बहुतेक सर्वच भाषांच्या सिनेमात असत. हिंदी आणि मराठीतली भक्तिगीते आपल्या परिचयाची आहेत इतकेच! असेच एक सुंदर भक्तिगीत होते सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. संगीत होते दशरथ पुजारी यांचे आणि गीत पुन्हा मधुकर जोशींचेच!

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे.’

यातले ‘निराधार आभाळाचा’ हे शब्द आले की, मला बायबलमधील ‘इयोब’ या भागाच्या २६व्या अध्यायातील सातवे वचन आठवायचे. त्यात म्हटले आहे –

‘त्याने नभोमंडल शून्य अवकाशावर पसरिले आहे,
त्याने पृथ्वी कोणत्याही आधाराशिवाय टांगली आहे.’

‘निराधार आभाळ’ काय आणि ‘हवेत टांगलेली’ पृथ्वी काय! ईश्वराची स्तुती सगळीकडे सारखीच आहे, हा प्रत्यय आपल्याला पुन:पुन्हा येत राहतो. फक्त त्यासाठी स्वच्छ नजरेने आणि पूर्वग्रह टाळून सगळीकडे पाहत राहिले पाहिजे.

जुन्या काळी अशी भजने, अभंग, भक्तिगीते सतत कानावर पडल्याने भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असलेल्या दोन्ही महाकाव्यातील कथा लोकांना अगदी लहानपणीच सहज माहीत होऊन जात. कुंतीच्या कथेचे साम्य बायबलमधील मोशे नावाच्या मेंढपाळाच्या कथेशी आहे. पुढे प्रेषित बनलेल्या या मोशेच्या आईने कर्णासारखेच त्याला एका टोपलीत ठेवून पाण्यात सोडून दिले होते. मधुकर जोशींच्या गीतात कुंतीच्या कथेचा उल्लेख येतो, तो मात्र परमेश्वराची स्तुती करण्याच्या निमित्ताने!

बाळ सोडूनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे..

अशीच लहान मुलांना आवडणारी भक्त प्रल्हादाची कथा नकळत बालमनावर बिंबवली जायची –

‘भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नरसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकिक त्याची मूर्ती अजुनी विश्व पाहे.
जागी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.’

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ हाच भाव असलेले एक गाणे अगदी अलीकडच्या एका हिंदी सिनेमात होते. मराठी गाण्याचे शब्दश: भाषांतर वाटावे, असे ते शब्द होते चक्क अमिताभ बच्चनच्या तोंडी. सिनेमा होता ‘लावारिस’
‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो..’
अंजान यांनी लिहिलेल्या आणि किशोरदांनी गायलेल्या या गाण्याला संगीत दिले होते, कल्याणजी आनंदजी यांनी! अंजान यांनी तर या गाण्यात इस्लामिक कल्पनेवर आधारित मोठा विचार दिला होता.

‘हम तो क्या है वो फरीश्तों को आजमाता है’ असे मांडून ते पुढे म्हणतात –
‘बना कर हमको मिटाता है, फिर बनाता है.
आदमी टूट के सौ बार जुडम है यारों,
जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारों
मै नही कहता, किताबों में लिखा यारों.

अर्थात सिनेमातील क्षणिक प्रसंगासाठी मुद्दाम लिहिलेल्या अशा गीतांचा प्रभाव सकाळी ऐकलेल्या भक्तिगीतांइतका टिकाऊ नसायचा हे मान्य. मात्र, एकाकी व्यक्तीला, जीवनात हरलेल्या दु:खी माणसाला, असे आश्वासक शब्द प्रचंड दिलासा देत असत. जीवन आहे तसेच स्वीकारायची शक्ती देत असत.

शेवटी प्रत्यक्षात नाही, तर निदान कल्पनेतल्या विश्वात, आपल्याच मनात तरी आपले कुणीतरी असावे, तसे ते आहे, त्याला आपण स्वीकारार्ह आहोत, ही जाणीव प्रत्येकाला आवश्यक असते. मनाच्या अथांग पोकळीत टांगलेल्या जीवाला आधाराची गरज असते. पृथ्वीच्या वर आकाशाचा तंबू ताणून बसविणारा तो जगन्नियंताच आपला आहे, ही भावना खूप आश्वासक असते. तिच्या सहाय्याने माणसात हवा तो बदल घडवून आणता येतो. कदाचित हेच आधीच्या चिंतनशील कवींनी ओळखले असावे.