X Close
X
9819022904

‘एसटी’त नव्या कामगारांच्या भरतीच्या हालचाली


Jobs-FTY457

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातल्या एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी एसटी महामंडळात साडेतीन हजार नव्या कामगारांची भरती करण्यावर शासन विचार करत असल्याचे स्पष्ट केल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामगारांचे नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विलीनीकरणाशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

राज्यात गेल्या १२-१३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप मोडून काढण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून साधारण अडीच हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. शेकडो कामगारांना सेवामुक्तीच्या नोटिसाही धाडण्यात आल्याचे कळते. कर्मचारी कामावर न आल्यास त्यांना नोकरीतून काढून टाकले जाईल, असा इशाराही परब यांनी दिला होता. तरीही कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने आता परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी नवी कामगार भरती करण्याचा इशारा दिला आहे.

‘कर्मचाऱ्यांचे हित पाहणे जसे शासनाचे कर्तव्य आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा सुरू करणे हेही सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे २०१६-१७ तसेच २०१९ साली झालेल्या एसटीतल्या भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना एसटीत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे’, असे परब यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे नियोजित कर्मचारी यायला तयार आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आम्हालाच पैसे मिळत नाहीत. तेव्हा त्यांची अवस्था काय असेल हे ते जाणतात, असे ते म्हणाले. संपकऱ्यांचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. काल एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. सरकार निलंबनाची भीती दाखवत आहे. आजच्या बैठकीत फडणवीस यांनी कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो, याचे मार्गदर्शन अनिल परब यांना केले आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही. अनिल परब यांनी त्यांच्या चालकाला दिला जाणारा पगार तरी एसटी कामगाराला द्या, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

संपावरील कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशीही यावर चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबणे हे राज्याच्या हिताचे नाही. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज माझी मुंबईत भेट घेतली. प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि महिला प्रतिनिधींनी यावेळी त्यांच्या समस्या कथन केल्या. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. बुलढाण्यात एका कर्मचाऱ्याने आत्महत्त्या केली.

(PRAHAAR)