X Close
X
9819022904

‘एमपीएससी’ची उद्याची पूर्व परीक्षा लांबणीवर


Mumbai:

मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने, येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी यासंदर्भात तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकारी यंत्रणेवरही त्यामुळे ताण येत आहे. त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता आणि ‘एमपीएससी’ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.