X Close
X
9819022904

३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये कोकण!


Mumbai:

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपण मोहिमेंर्तगत ३३ कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड झाली, तर पर्यावरण संतुलन निश्चितच साधले जाईल. राज्य सरकारची कागदावरची आकडेवारी कधीच प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. योजना यशस्वितेचे दावे नेहमीच फोल असतात. शासकीय उद्दिष्ट योजना यशस्विता उद्दिष्टपूर्ती हे सारेच शब्द बनवाबनवी करणारे आहेत. हे आमजनतेला माहीतच आहे. वृक्ष लागवड हा विषय मात्र वेगळा आहे. प्रत्येक वर्षी राज्यशासनाकडून वृक्ष लागवडीविषयी जाहीर केले जाते. प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. दिलेले उद्दिष्ट कधीच पूर्ण होत नाही. अनेकवेळा त्या उद्दिष्टाच्या जवळपासही जात नाही. परंतु तरीही दरवर्षी वृक्ष लागवडीचे मोठाले आकडे जाहीर केले जातात. गेल्या काही वर्षातील वृक्ष लागवडीचे जाहीर केलेले आकडे पाहिले तरीही आजच्या घडीला वृक्ष लागवडीसाठी जागाच शिल्लक राहाता कामा नये, अशी स्थिती असायला हवी होती; परंतु जाहीर आकडेवारी आणि जुनीच वृक्ष लागवड यांचा ताळमेळ शासकीय अधिकारी कागदावर बेमालूमपणे चढवतात. कोकणात वृक्षतोड गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणावर झाली.

या वृक्षतोडीमध्ये जंगली जुनाट वृक्षांची तोड मोठय़ा प्रमाणावर झाली. डोंगर, द-यांमध्ये असलेली वृक्षराई नाहीशी झाली. माळरान उजाड झाले मात्र त्याचवेळी आघाडी सरकारच्या काळातील फलोद्यान योजनेच्या अनुदान योजनेतून मोठय़ा प्रमाणावर काजू, कोकम लागवड करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात या वृक्ष लागवडीचे उजाड माळरानावर वृक्षरांगा दिसू लागल्या. कोकणात शासकीय स्तरावर वृक्ष लागवड किती झाली, हा प्रश्नच आहे. मात्र अनेक सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीकडे विशेषत्वाने लक्ष दिले आहे. डॉक्टर फॅटर्नटी क्लब, जांभवडे पंचक्रोशी युवा निसर्गप्रेमी, केएमए कुडाळच्या संस्थेतर्फे सोनगडावर वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न तर होईलच; परंतु त्याचबरोबर गडकिल्ल्यांकडे आपोआपच जाणा-यांचा ओघ वाढेल. दुर्गप्रेमी आवर्जून जातात. कोणत्याही सोई-सुविधा नसतानाही गडावर जाऊन इतिहासाच्या पाऊलखुणांना नतमस्तक होतात. आज अनेक गड फार दुर्लक्षितही झाले आहेत. ठरावीकच गडकिल्ल्यांवर लोकांची ये-जा असते. परंतु बहुतांश किल्ल्यांवर जाणा-यांची संख्या फार कमी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात इतिहासाची साक्ष देत हे गड उभे आहेत. या गडांवर जर वृक्ष लागवड करण्यात आली तर तो एक वेगळा उपक्रमही ठरू शकेल. वृक्ष लागवडीसाठी अनेक संस्थांचा पुढाकारही असणे आवश्यक आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे कोकणातील महामार्गालगतचे अनेक जुनाट वृक्ष नष्ट झाले आहेत. ही वृक्षतोडही मोठय़ा प्रमाणावर झाली आहे.

चौपदरीकरणाच्या या कामात नव्याने वृक्ष लागवड होण्याची आवश्यकता आहे. ज्या मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे, त्या प्रमाणात महामार्गानजीक वृक्ष लागवड होताना दिसत नाही. ब्रिटिशांनी मार्ग निर्माण करताना रस्त्याच्या बाजूला लोकांना उपयोगी होतील अशा वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मध्यंतरी कोकणातील महामार्ग आणि राज्यमार्गावर आकेशियाची लागवड करण्यात आली होती. सामाजिक वनीकरण विभागाने अमेरिकेने फेकूण दिलेल्या वृक्षांची लागवड आपल्याकडे करण्यात आली. त्याचे व्हायचे तेच दुष्परिणाम झाले. महामार्गावर तर खूप मोठय़ा प्रमाणावर अपघात झाले. आकेशिया वृक्षाची फळे रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर वाहनांचे अपघात व्हायचे. पावसाळय़ात पहिल्या पंधरा दिवसांत या अपघातांचे प्रमाण वाढलेले असायचे. पूर्वीचे वटवृक्ष, आंबे अशी झाडे नष्ट करण्याचे ते पाप होते. हे चुकीचे झाले आहे. हे वनविभागाच्या लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता.

कोकणात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड होण्याची आवश्यकता आहे. कोकणला निसर्गत: खूप काही मिळाले आहे. मिळतही आहे. जंगलामध्ये असलेली औषधी वनस्पती, जुनाट वृक्ष जपले पाहिजेत. वृक्ष जपतानाच नव्या वृक्षांचे रोपणही झाले पाहिजे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये वृक्षतोडही मोठय़ा प्रमाणावर होत असते. जुनाट वृक्ष नष्ट करण्याचे काम केले जाते. जितक्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला हवी याबरोबरच जुनाट वृक्षांची तोड करण्यावर बंदी असतानाही काही जंगली झाडांची राजरोसपणे तोड होते. यात वनविभागाचाही सहभाग असतो. ज्यांनी राखायचे आहे त्यांनीच रान मोकळे करून दिले तर दुसरे काय होणार आहे.

वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ व्हायला हवी. आज तरी हिरवाई वाटत असली तरीही ती पुरेशी हिरवाई नाही. उजाड होण्याचे जे प्रमाण आहे, त्या तुलनेत होणारी लागवड याचे मोजमाप होणार नाही. कोकणची शान ही इथला निसर्ग आहे. ते टिकवण्यासाठी सर्व स्तरांतून प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. याच प्रयत्नातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखता येईल.

मोबाईल – ९४२२४३६६८४