X Close
X
9819022904

१२वी परीक्षा : संभ्रम कायम


board-exam-8904

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीतही राज्याच्या शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मात्र, याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात दिरंगाई झाल्यामुळे याबाबतची घोषणा होऊ शकली नाही. तथापि, गुरुवारी याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णयाची घोषणा झालेली नसल्यामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमात पडले आहेत.

केंद्र सरकारने ‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजरात, हरयाणा आणि मध्य प्रदेश, या राज्यांनीदेखील आपापल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीच्या परीक्षांबाबत नेमका काय निर्णय होणार याची चर्चा सुरू झाली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यावर आजही निर्णय न झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. मात्र, यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे संबंधित फाईल पाठवण्यात आली आहे. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असे त्या म्हणाल्या.

१२वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. ती आम्ही मेअखेरपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतरदेखील कोरोनामुळे ती पुन्हा पुढे ढकलली गेली. केंद्राने मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनीदेखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सुसूत्रता असायला हवी असे म्हटले होते. पंतप्रधानांनी सीबीएसईचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांचे अभिनंदनही केले होते. या सर्व बाबींविषयी मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द केल्या आहेत. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोना परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावी परीक्षा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

(PRAHAAR)