X Close
X
9819022904

हाफिज सईद, दाऊद इब्राहिमसह चार जणांना दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या निर्णयाला अमेरिकेचा पाठिंबा


dawood-ibrahim

नवी दिल्ली : लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद, मौलाना मसूद अझर, झाकि उर रहमान व दाऊद इब्राहिम या चौघांना भारताने बदललेल्या कायद्याअंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारताच्या या नवीन कायद्यामुळे दोन्ही देशांच्या दहशतवाद निपटण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल असे ट्विट अमेरिकी अधिका-यांनी केले आहे.

बुधवारी भारत सरकारने अधिसूचना काढून या चौघांना सुधारित बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणा-यांमध्ये या चौघांचा समावेश असून याआधीच संयुक्त राष्ट्रांनी या चौघांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

एक महिन्यापूर्वीच १९६७ मधील सदर कायद्यातील सुधारणेला संसदेमध्ये मंजुरी देण्यात आली होती. सुधारित कायद्या अंतर्गत प्रथमच दहशतवादी ठरवणा-यांमध्ये या चौघांचा समावेश आहे. यामुळे आता अशा प्रकारच्या दहशतवाद्यांवर दोन्ही देश संयुक्तपणे कारवाई करू शकणार आहेत. कायद्यातील सुधारणा करण्यापूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी ठरवण्याची तरतूद होती, व्यक्तिंना दहशतवादी घोषित करता येत नव्हते.

(PRAHAAR)