रोमानिया/डेन्मार्क (वृत्तसंस्था) : युरो चषकाच्या बाद फेरीच्या सोमवारी (२८ जून) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध स्पेन तसेच फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती रंगतील. स्वित्झर्लंडविरुद्ध फ्रान्सचे पारडे जड आहे. पहिल्या सामन्यात तुलनेत बरोबरीचे असलेले क्रोएशिया, स्पेन आमनेसामने आहेत.
स्वित्झर्लंड फ्रान्सला रोखेल?
फ्रान्सने ड गटात अव्वल स्थान मिळवले. त्यांना पराभव पाहावा लागला नाही. एक विजय मिळाला तर उर्वरित दोन सामने बरोबरीत सुटले.
अ गटात तिसरे स्थान मिळवत स्वित्झर्लंडने बाद फेरी गाठली. तुर्कीवर मोठा विजय मिळवणाऱ्या स्वित्झर्लंडला इटलीकडून मोठ्या फरकाने मात खावी लागली. तिसऱ्या सामन्यात वेल्सला बरोबरीत रोखताना त्यांनी आगेकूच केली. दुसऱ्या स्थानासाठी त्यांच्यात आणि वेल्समध्ये चुरस होती. त्यात स्वित्झर्लंड तिसऱ्या स्थानी फेकला गेला. फ्रान्सचा गोलफरक (४-२) पाहता स्वित्झर्लंडचा कस लागेल. त्यांचा गोलफरक (३-२) चांगला आहे.
क्रोएशिया-स्पेन लढतीत चुरस अपेक्षित
आजवरची कामगिरी पाहता मागील आठ सामन्यांत स्पेनने क्रोएशियावर ४-३ अशी आघाडी घेतली आहे. एक सामना बरोबरीत सुटला. गटवार साखळीतील क्रोएशिया, स्पेनची कामगिरी संमिश्र आहे. दोघांना आपापल्या गटात दुसरे स्थान मिळाले आहे. मात्र, क्रोएशियाच्या तुलनेत स्पेनने एक गुण अधिक मिळवला आहे.
ई गटात स्पेनने एक विजय मिळवला. परंतु, दोन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले. पराभव पाहावा न लागलेल्या स्पेनच्या खात्यात पाच गुण आहेत. ड गटातील क्रोएशियाने एक विजय मिळवला. एकदा बरोबरी झाली. सोबत एकदा पराभवाची चवही चाखावी लागली. गोलफरकाबाबत स्पेनने (६-१) प्रतिस्पर्ध्यांवर (४-३) वर्चस्व राखले आहे.
(PRAHAAR)