मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे अनुयायी व सावरकर लंडनमध्ये राहात असलेल्या ठिकाणी स्मारक शिळा स्थापन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि ऐतिहासिक विषयांचे लेखन करून जागृती करणारे वासुदेव शंकर तथा व्ही. एस. गोडबोले यांचे गेल्या आठवड्यात लंडन येथे निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे ते रुग्णालयात दाखल होते, अशी माहिती त्यांचे पुत्र संकेत गोडबोले यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्यावेळी त्यांनी भारतातील विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच इंग्लंडमध्ये भारतीयांनी चालवलेल्या वृत्तपत्रांमध्येही अनेक लेख लिहिले होते. तेथे भाषणे करून सावरकरांचा परिचयही नवीन पिढीप्रत पोहोचवला. गोडबोले यांच्या स्मृतिला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सावरकर यांचे महत्त्वसांगणारे व सावरकर यांचा बुद्धिवाद सांगणारे भाषण सावरकर स्मारकामध्ये २०१६ या वर्षी ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केले होते. त्यात त्यांनी विविध बाबींवर मोठा प्रकाश टाकला होता, त्याचीही आठवण यावेळी वराडकर यांनी करून दिली.
व्ही. एस. गोडबोले लंडनमध्ये निवासी होते व तेथे ते अभियंते म्हणून काम करीत होते. ते करीत असतानाच त्यांनी सावरकर व भारतीय क्रांतिकारक यांच्याविषयी जिव्हाळ्याने व तडफेने काम केले होते.
(PRAHAAR)