राहुल गांधींकडून ‘बेचेंद्र मोदी’ असा उल्लेख
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘बेचेंद्र मोदी’ असा करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बेचेंद्र मोदी सुटा-बुटातील मित्रासोबत देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकत आहेत’, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ज्याला देशाने अनेक वर्षे मेहनत करून मोठे केले, असे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ‘बेचेंद्र मोदी’ सुटा-बुटातील मित्रासोबत विकत आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणा-या लाखो कर्मचा-यांसाठी भीती आणि अनिश्चिततेची वेळ आहे. मी या लुबाडणुकीच्या विरोधात त्या लाखो कर्मचा-यांसोबत खांद्यांशी खांदा लावून उभा आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी एक कार्टूनही शेअर केले आहे.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील यवतमाळ येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी मोदींची तुलना पाकीटमारांशी केली होती. मोदी हे अंबानी व अदानींचे लाउडस्पीकर असून त्यांची नीती ही एका पाकीटमारासारखी झाली आहे. पाकीटमार चोरी करण्यापूर्वी लोकांचे लक्ष विचलित करतो, असे राहुल म्हणाले होते.