मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक लोकल थेट बफरला जाऊन धडकली. ही घटना फलाट क्रमांक तीनवर शुक्रवारी 30 ऑगस्ट दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अचाकन घडलेल्या या प्रकाराने प्रवासी मात्र घाबरुन गेले. या घटनेनंतर सीएसएमटी स्थानकावरील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही वेळ लोकल उशीरा धावत होत्या.
सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारची घटना घडली होती. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली होती. ही घटना घडली तेव्हा पंकज गुलाबचंद इंदोरा नावाचे मोटरमन लोकल चालवत होते. ते मुळचे जयपूरचे होते. पुढे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, 26 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोटरमन पंकज इंदोरा यांना तातडीने बडतर्फ करा अशी मागणी केली होती. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच, लोकलचेही फारसे नुकसान झाले नाही. लोकल बफरला धडकली नाही. तर, केवळ बफरला लोकलचा धक्का लागला, असे सांगत रेल्वे प्रशासनाने पंकज गुलाबचंद इंदोरा या मोटरमनवर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला होता. आजच्या घटनेनंतर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(PRAHAAR)