X Close
X
9819022904

सावधगिरी बाळगा… कोरोना वाढतोय!


Corona-0980E03052021062907

परदेशातून सुरुवातीला एक व्यक्ती आला आणि भारतात कोरोना पसरवून गेला. त्यानंतर अनेकजण भारतात आले. तेही कोरोना पॉझिटिव्ह होते. उत्तर प्रदेशातील एका नटीने ती स्वत: कोरोना पाझिटिव्ह असताना मोठ्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. हळूहळू भारतात कोरोना पसरत गेला. महाराष्ट्रानेही कोरोनाच्या बाबतीत मोठी उचल खाल्ली. मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यापाठोपाठ ठाणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, अकोला, कोल्हापूर या शहारांमध्ये त्याचा अधिक प्रभाव दिसून येत होता. त्यानंतर कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला. कोरोनाच्या निर्माण झालेल्या भीतीमुळे रुग्णांची संख्या वाढत होती. परिणामी दवाखाने रुग्णसंख्येने भरून जात होती. मृत्यूचा आकडाही वाढत होता. कोरोनाची भीती अधिकच गडद झाली होती.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी २२ मार्च २०२० रोजी देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महाराष्ट्र तर हॉटस्पॉट बनला होता. चीनच्या वूहान प्रांतातून कोरोना भारतातच नव्हे, तर जगभर पसरला होता. यात जगात सर्वाधिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेत भयावह परिस्थिती होती. इंग्लंड, जर्मनी, ब्राझिल, स्पेन, रशिया या व अन्य देशात कोरोना पसरला आणि दिवसागणिक मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत होते. तसेच मृतांचा आकडाही वाढत होता. हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे तो अनेकांना आपल्या कवेत घेत होता. सर्वत्र झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये खूपच भीती निर्माण झाली होती. त्यातच अनेकांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या. महाराष्ट्रात राज्य सरकार दररोज अनेक उपाययोजना करीत असतानाच नवनवीन आदेश काढले जात होते. मुंबई आणि पुणे हॉटस्पॉट बनल्यामुळे या शहरातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मुंबई आणि पुण्याबाहेर पडत होते. त्यातच सुरुवातीच्या काळात जिल्हाबंदी, विभागबंदी करण्यात आली होती. शिवाय लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सुरुवातीचा दीड महिना लोकांना घरातच अडकून पडावे लागले. या काळात अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. दुकानांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी दुकानांवर गर्दी झाली होती. ज्या ज्या भागात कोरोनाचा शिरकाव होत होता, तो भाग पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सील करण्यात येत होता. लोकांनी घराबाहेर पडू नये, लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून रस्त्या-रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. यात कुणी सापडलाच तर त्यास बेदम मारही खावा लागत होता. खानावळी, भोजनालये, हॉटेल्स बंद करण्यात आली होती. मुंबईतील लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या होत्या.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. एकूणच कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये, यासाठी सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यातच अमका भाग हॉटस्पॅाट बनला, या शहारात कोरोनाचे रुग्ण सापडले, त्या शहरात रुग्ण सापडले, अशा बातम्या प्रत्येकाच्या कानावर पडत होत्या. साधी सर्दी झाली किंवा ताप आला तरी अशा रुग्णांनी घरी न थांबता कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात होत्या. याच काळात डॉक्टर, पोलीस, पत्रकार, नर्सेस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, चित्रपट क्षेत्रांतील अमक्याला कोरोना झाला, या मंत्र्याला, आमदार-खासदाराला कोरोना झाला, अशा बातम्या वृत्तपत्रांतून, विविध वृत्तवाहिन्यांमधून येत होत्या. आज इतके मृत्यू झाले, तितके झाले, असेही कानावर पडत होते. त्यामुळे अधिकच भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. लॉकडाऊन एकदाचा कधी संपतो आणि आपापल्या गावाचा, घराचा रस्ता कधी धरतो, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकजण तर उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये व अन्य राज्यांत कित्येक किलोमीटरचे अंतर कापत पायीच निघून गेले. अशीच स्थिती महाराष्ट्रातही होती. कोरोनाची पहिली लाट कशी तरी संपली. दुसरी लाट सुरू होणार आणि पहिल्यापेक्षाही ती अधिक तीव्र असेल, असे सांगितले जात होते. कोरोनामुळे सण-उत्सव बंद झाले, सर्वच धार्मिक देवस्थाने बंद होती. लग्न समारंभावर निर्बंध आले होते. एकूणच कोरोना काळातील दिवस सगळ्यांसाठी भयावह होते. एखाद्याचा मृत्यू झाला, मग ती व्यक्ती घरातील असली तरी २० लोकांपेक्षा अधिक जणांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहू नये, असे शासनाचे निर्देश होते. कोरोनाचा विषाणू चीनमधून पसरल्यामुळे चीनच्या नावे बोटे मोडली जात होती, शिव्याशाप दिला जात होता. असो. ते भयावह दिवस सर्वांनी पाहिले आणि अनुभवले. आता पुन्हा कोरोना डोके वर काढू पाहत आहे. कोरोनाची भीती आता अनेकांनी मनातून काढून टाकली असली तरी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, हे ध्यानी ठेवले पाहिजे. काय होते, असे म्हणून त्याकडे कानाडोळा करता येणार नाही. १६ ते २५ मार्चदरम्यान महाराष्ट्रात २६४८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिसऱ्या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून रुग्णवाढीच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून राज्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पूर्वीसारखे दिवस आपल्या वाटेला येणार नाहीत, याबाबत प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणे, सातत्याने मास्कचा वापर करणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, या व अशासारख्या ज्या उपाययोजना आहेत, त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. असे झाले, तरच आपण कोरोनाचा शिरकाव होण्यापासून स्वत:ला, इतरांना आणि आपल्या राज्यालाही वाचवू शकू.

(PRAHAAR)