X Close
X
9819022904

सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूडला धक्का, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर कालवश!


Rishi-Kapoor-300x220
मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तोच कलाविश्वातील दुसऱ्या दु:खद बातमीने गुरुवारी बॉलिवूडवर शोककळा पसरली. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.

ऋषी कपूर यांना मुंबईतील रूग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात ते परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते.

११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना बुधवार मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरे वाटत नव्हते.

त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. कपूर कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात गुरुवारी सकाळी ८.४५ मिनिटांनी ऋषी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमिया आजाराशी लढत होते.

गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर ते फार आनंदी होते आणि त्यांना प्रत्येकाला भेटायची इच्छा होती. पण हा आजार त्याच्यापासून दूर गेला नाही. ऋषी यांना काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील इस्पितळात भरती केले होते. तेव्हाही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. यानंतर मुंबईत आल्यावर व्हायरल फिवरमुळे त्यांना इस्पितळात काही दिवसांसाठी भरती करावे लागले होते. ऋषी त्यांच्या सिनेमांप्रमाणेच निर्भीड प्रतिक्रियेसाठीही ओळखले जायचे. सामाजिक स्थितीवर ते अनेकदा भाष्य करायचे.

मात्र २ एप्रिलनंतर त्यांनी एकही ट्विट केले नव्हते. सिनेसृष्टीने अभिनेता इरफान खानला २९ एप्रिलला गमवले, तर त्याच्या एक दिवसानंतर ३० एप्रिलला ऋषी यांनी जगाचा निरोप घेतला. सिनेसृष्टीचे हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखे आहे. बॉलिवूडला मोठा धक्का कालच अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आणि पाठोपाठ ऋषी कपूर यांनीही जगाला अलविदा म्हटले. पाठोपाठ दोन दिग्गज अभिनेत्यांना बॉलिवूडने गमावले़ यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १९७३ च्या ‘बॉबी’पासून २००० पर्यंत ऋषी कपूर हे नायकाची रोमँटिक भूमिका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते.

२००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. नमस्ते लंडन, औरंगझेब, हाउसफुल्ल २, स्टुडंट ऑफ द ईयर, अग्निपथ अशा व अशाच अनेक हिट सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. दमदार भूमिका ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

‘बॉबी’, ‘दामिनी’, ‘दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘जय हिंद’ म्हणत भारतीयांना केले होते शेवटचे आवाहन भारतीय चित्रपटाला रोमँटिक चेहरा देणारा अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांना ओळखले जाते. ऋषी कपूर हे सोशल नेटवर्किंगवर खूप अ‍ॅक्टीव्ह होते.

ते ट्विटवरुन नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडींसंदर्भात व्यक्त होत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्ध्यांसाठी एक ट्विट केले होते. कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला एकत्र जिंकायची आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

‘वेगवेळी विचारसरणी आणि सामाजिक स्तरातील सर्व बंधू-भगिनींना मी आवाहन करतो की हिंसा करु नका, दगडफेक किंवा मारहाणीसारख्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, मेडिकल, पोलीस हे त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला ही कोरोनाविरुद्धची लढाई एकत्र जिंकायची आहे. जय हिंद’, असे ऋषी कपूर यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये म्हटले होते.

देशामध्ये कोरोनासंदर्भात चिंता वाढू लागल्यापासून ऋषी कपूर यांनी अनेकदा ट्विट करुन त्यासंदर्भात आपले मत मांडले होते. अगदी देशात आणीबाणी लागू करण्यापासून ते कनिका कपूरप्रकरणापर्यंत त्यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अखेरपर्यंत चेहऱ्यावर हास्य ऋषी कपूर यांनी शेकडो चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

अखेरच्या क्षणापर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा ध्यास त्यांनी पूर्ण केला. होय, कपूर कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अखेरचा श्वास घेईपर्यंत रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचे मनोरंजन करत होते. बुधवारी रात्री उशीरा ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना मुंबईच्या आयएसटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सेसनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर शेवटपर्यंत हसतखेळत बोलत होते. विनोद करत होते.

शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले. गेल्या दोन वर्षांपासून ऋषी कपूर यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानही ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावर कधीच निराशा, ताण, वेदना दिसल्या नाहीत. खिलाडूवृत्तीने आणि अतिशय धैर्याने ते या आजाराला सामोरे गेले. कुटुंब, मित्रांसोबत मौजमस्ती आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखणे व चित्रपट पाहणे एवढेच अखेरच्या दिवसांत त्यांनी केले. आजारपणात त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांच्यातील उत्साह, त्यांच्यातील उर्मी पाहून अवाक होत. घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन अभिनेता इरफान खान यांच्याप्रमाणेच ऋषी कपूर यांनाही आपल्या आईचे अंत्यदर्शन घेता आले नाही.

ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आजारपणामुळे ऋषी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते. ऋषी यांच्या आयुष्यात त्यांच्या आईची एक खास जागा होते. त्यामुळे आईच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहायला न मिळाल्याने त्यांना खूपच वाईट वाटले होते. त्यांच्यासाठी तो काळ अतिशय वाईट होता असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, मी न्यूयॉर्कला गेल्यानंतर दोनच दिवसांत आईचे निधन झाले.

मला कॅन्सर झाला असल्याची आईला कल्पना होती. मी भारतात परत यायचा विचार केला होता. पण माझ्या भावाने मला सांगितले की, तू येऊन देखील उपयोग होणार नाही… तोपर्यंत सगळ्या विधी झालेल्या असतील.

मी आजारपणामुळे खूपच अशक्त झाल्याने माझ्यात देखील ताकद नव्हती. ऋषी कपूर यांचा संक्षिप्त परिचय भारतीय सिनेसृष्टीत महत्वाचे योगदाने देणाऱ्या कपूर घराण्यातील एक बिनधास्त व्यक्ती आणि बॉलिवूडचे एक एव्हरग्रीन व्यक्तीमत्व ऋषी कपूर यांचा संक्षप्त परिचयङ्घ पूर्ण नाव – ऋषी राज कपूर जन्म – ४ सप्टेंबर १९५२ (मुंबई) मृत्यू – ३० एप्रिल २०२० (मुंबई) शिक्षण – कॅम्पेन स्कूल, दक्षिण मुंबई भावंडे – रणधीर कपूर (मोठा), राजीव कपूर (छोटा) पत्नी – नीतू सिंग (अभिनेत्री) मुले दोने – रणबीर कपूर, रिध्दिमा नातलग – शशी कपूर (चुलते) शम्मी कपूर (चुलते), करिना कपूर (पुतणी), करिश्मा कपूर (पुतणी) पहिला सिनेमा – मेरा नाम जोकर (१९७०), मुख्य भूमिकेतील पहिला सिनेमा – बॉबी (१९७३) दिग्दर्शन – आ अब लौट चले (१९९९) शेवटचा सिनेमा – द बॉडी सुरु असलेला सिनेमा – शर्माजी नमकीन (PRAHAAR)