अझर अलीकडे कसोटी, बाबरकडे टी-ट्वेंटीची धुरा
कराची : यष्टिरक्षक, फलंदाज सर्फराझ अहमदची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. खराब कामगिरीमुळे त्याची उचलबांगडी करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवडसमिती अध्यक्ष मिसबाह उल-हक यांनी श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशात झालेल्या झटपट मालिकेसाठी सर्फराझची कर्णधार म्हणून फेरनिवड केली होती. पण टी-ट्वेंटी मालिकेत यजमानांवर ‘व्हाईटवॉश’ची नामुष्की ओढवली. सर्फराझला वैयक्तिक खेळ उंचावता आला नाही.
सर्फराझच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नाही. तब्बल १० वर्षानी पाकिस्तानमध्ये खेळताना श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका २-० अशी जिंकली. पण टी-ट्वेंटी मालिकेत पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला.
सर्फराझला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर आगामी ऑस्ट्रेलिया दौ-यातील दोन कसोटी सामन्यात अझर अली पाकिस्तानचे नेतृत्व करेल. टी-ट्वेंटी मालिकेसाठीचे कर्णधारपद बाबर आझमकडे सोपवण्यात आले आहे. ही मालिका तीन सामन्यांची असेल. २५ वर्षीय बाबर प्रथमच देशाचे नेतृत्व करणार आहे.