X Close
X
9819022904

शाळा, मंदिरं अविरत सुरू राहण्यासाठी…


Lockdown-76YE7824032020023140

राज्यातील शहरी भागांत आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा सोमवार, ४ ऑक्टोबरपासून आणि मंदिरं गुरुवार ७ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्यामुळे कोरोना महामारीच्या दहशतीने काळवंडलेल्या वातावरणात फार मोठा सकारात्मक बदल घडून आला असून कित्येकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले असणार. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या प्रक्रियेमुळे सारे व्यवहार, दळणवळण, उद्योग – व्यवसाय ठप्प झाले होते. संचारबंदीच्या या शृंखलेचा सर्वाधिक फटका हा शाळा – महाविद्यालयांना बसला. त्याचबरोबर लोकांची गर्दीची ठिकाणे प्रथम बंद करण्यात आल्याने प्रमुख देवस्थानांबरोबरच सर्व मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. कोरोना विषाणूचा हल्ला घरातील छोट्यांवर होऊ नये अशी रास्त भीती प्रत्येक घरात व्यक्त होत राहणे हेही स्वाभाविक आहे. त्यामुळे संसर्गापासून ही मुले कितपत दूर राहू शकतील याविषयी पालकांप्रमाणेच शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारलाही संदेह वाटत होता. मात्र लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आणि दुसऱ्या लाटेच्या रौद्र तडाख्यानंतर अलीकडे बाधितांचे प्रमाणही आटोक्यात आल्यामुळे, शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू करणे क्रमप्राप्त होते.

त्यातच मंदिरंही खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. गेले अठरा महिने बंद असलेल्या शाळांची दारे नुकतीच उघडण्यात आली. घरात बंदिस्त असलेल्या छोट्यांना शाळेत परतणे वाटते तेवढे सोपे नाही हे सर्व संबंधितांना चांगलेच ठाऊक असणार. पालक-शिक्षक आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हे सर्वच खूप आव्हानात्मक आहे हे नििश्चत. गेले दीड वर्षं शाळा बंद असण्याचा परिणाम सर्वांवर वेगवेगळा व भिन्न प्रमाणात झाला आहे. मुलांचा, शिक्षकांचा एकमेकांशी असलेला थेट संपर्क खऱ्या अर्थाने तुटला आहे. या कोरोना काळात प्रत्येकाच्या घरातील परिस्थिती वेगळी होती. काहींना जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख, काहींना नोकरी, रोजगार गमवावे लागल्याने आलेले नैराश्य, उद्योग- व्यवसायांत प्रथमच झालेले बदल व त्यातून आलेली अनिश्चितता, आवकच होत नसल्याने सतत पैशांची भासणारी चणचण, भविष्याबद्दलची भीती व घालमेल, ऑनलाइन शिक्षणामुळे विस्कटलेली घडी, त्यातच मोबाईलचे लागलेले वेड आणि व्यसनाधिनता या व अशा अनेक आव्हानांना बहुतेकांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शाळेत परतताना असंख्य भावनांनी घेरलेली ही मुले आणि त्यांचे भांबावलेले पालक यांना परत शिक्षण व्यवस्थेमध्ये सामावून कसे घ्यायचे, अध्ययनाला पोषक वातावरण कसे निर्माण करायचे, विद्यार्थ्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, असे अनेक प्रश्न पालक, शिक्षक, व्यवस्थापन यांच्यापुढे उभे राहिले आहेत. पण तज्ज्ञांचे सल्ले आणि बालरोगतज्ज्ञ यांच्या समितीने केलेल्या सर्वसाधारण सूचना यांचे पालन करणे आवश्यक ठरले आहे. त्यातूनच शाळांतील सर्व प्रौढांचे लसीकरण, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, योग्य पद्धतीने मास्कचा वापर, नियमितपणे हातांची स्वच्छता आणि सर्दी – तापासह अन्य काही आजारांची लक्षणे आढळल्यास शाळेत न येणे या सर्वसाधारण सूचना पाळणे क्रमप्राप्त आहे.

शाळेमध्ये योग्य प्रमाणात हवा खेळती ठेवणे, गर्दी टाळणे आवश्यक असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, एकमेकांच्या गोष्टींचा वापर टाळण्याबरोबरच नियमावलींबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करणे अधिक महत्त्वाचे बनले असून हे करताना पालक-शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे आवश्यक बनले आहे. शाळा – विद्यालये बेमुदत बंद असल्याने मुला-मुलींमधील वाढलेला एकाकीपणा, घरात कोंडून राहावे लागल्याने आलेले शैथिल्य, चीडचीड, कंटाळा, ताणतणाव, अनिश्चितता, भविष्याबद्दल चिंता, घालमेल या व अशा अनेक भावनांचा पाल्यांच्या आणि पालकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. नैराश्य, आवेगशीलता, चंचलपणा वाढला आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रथम भावविश्वाबाबत सक्षम करणे गरजेचे बनले आहे. किंबहुना मुला-मुलींचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी शाळा सुरू झाल्याने आता भावनांचा कल्लोळ समजण्यासाठी, त्याचे आकलन व्हावे यासाठी एक विशेष तासिका असणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थ्यांना त्यात भावनिक प्रशिक्षण देऊन भावनिकदृष्ट्या साक्षर करणे अत्यावश्यक आहे. हे सर्व करताना शिक्षक हा यातील प्रमुख धागा असून त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले भावनिक नाते मुला-मुलींच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मुला-मुलींना मिसळू देणे, गटा – गटांमध्ये संवाद साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील आजारांची सौम्य लक्षणे ओळखणे व त्यातून उद्भवणाऱ्या दुष्टचक्रापासून वाचविण्यासाठी शिक्षक आणि पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. मुलांचे आणि संपूर्ण घराचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी भावनिक चातुर्य उपयोगात आणणे महत्त्वाचे आहे. मंदिरांबाबतही अनावश्यक गर्दी टाळणे, भावनांना आवर घालणे, कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे या बाबी आवश्यक आहेत. तसे झाले तरच प्रदीर्घ लॉकडाऊननंतर हळूहळू सुरू होत असलेले हे व्यवहार बिनदिक्कत सुरू राहतील आणि आहे त्या परिस्थितीत कोरोना संकटावर मात करणे सर्वांना शक्य होईल, हे निश्चित.

(PRAHAAR)