X Close
X
9819022904

विद्याभारती : राष्ट्रीयत्वाचे संस्काराधिष्ठित शिक्षण


Education_cprEducation-11500

देश १९४७ साली स्वतंत्र झाला खरा, पण तोपर्यंत ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी अनुरूप अशी शिक्षणपद्धती आपल्याकडे सुरू केली होती. महाराष्ट्र त्यातल्या त्यात पुरोगामी असल्यामुळे आपल्याकडे शिक्षण सुरू होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांसारख्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होत्या; परंतु उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मात्र अशिक्षितांची खूप मोठी संख्या होती. त्यामुळे तेथे शाळांची गरज तसेच राष्ट्रीयत्वाची भावना, संस्कार, मूल्याधारित शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण देण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असणाऱ्यांना जाणवली आणि त्यातूनच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे १९५२मध्ये सरस्वती शिशू मंदिर या विद्यालयाची स्थापना झाली. केवळ पाच रुपये भाड्याने जागा घेऊन शाळा सुरू झाली, त्या आधीही कुरुक्षेत्र येथे १९४६ला अशाच राष्ट्रीय विचारांच गीता विद्यालय सुरू झालं होतं आणि हळूहळू अशा तऱ्हेच्या शाळांची संख्या वाढू लागली. उत्तर प्रदेशप्रमाणेच अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचं राष्ट्रीयत्वाचे संस्काराधिष्ठित शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू होत होत्या. अशा शाळांची संख्या वाढू लागली तसतसे त्यांच्या सामूहिक विकासासाठी ‘शिशू शिक्षा प्रबंध समिती’ स्थापन झाली. सरस्वती शिशू मंदिरकडे आता सुसंस्कारित आणि शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून समाजाकडून पाहिलं जाऊ लागलं. हळूहळू विविध राज्यांत अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था उभ्या राहू लागल्या होत्या. पंजाबमध्ये सर्व हितकारी शिक्षा समिती या नावाने, हरियाणामध्ये हिंदू शिक्षा समिती या नावानं शाळा स्थापन होऊ लागल्या. त्यातूनच अखिल भारतीय स्वरूप एकत्रित होऊन १९७७ साली विद्याभारती या संघटनेची स्थापना झाली.

देशभरात आज जवळजवळ तीस हजार शाळा विद्याभारतीच्या संकल्पनेतील शिक्षण देत असून दोन ते सव्वा दोन लाख शिक्षक हे शिक्षण देत आहेत. विद्याभारतीतर्फे शिशू वाटिका, प्राथमिक, माध्यमिक, उच्चशिक्षण तसेच संस्कार केंद्र, एकल विद्यालय, निवासी विद्यालय चालवली जातात. अगदी भारताच्या सीमारेषेवर असलेल्या काश्मीर, लडाख, जोधपूरसारख्या ठिकाणीसुद्धा विद्याभारतीच्या शाळा चालतात. या ठिकाणचे सैनिकसुद्धा विद्याभारतीच्या शाळाच्या संपर्कात आवर्जून येतात; कारण आपल्या मुलांना नेहमीच्या पाठ्यक्रमाबरोबरच अशा प्रकारचं राष्ट्रप्रेम, संस्कारक्षम शिक्षण मिळावे, असे त्यांनाही वाटत असते. विद्याभारतीच्या शाळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सरकारचं अनुदान या शाळांसाठी घेतलं जात नाही. प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याच्या बोर्डाचं शिक्षण मातृभाषेत दिलं जातं.

विद्याभारतीने संस्कृत, संगीत, योगासनं, शारीरिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण असे पाच आयाम ठरवले आहेत. यामध्ये अगदी पहिलीपासून योगासनं, व्यायाम, नीतिमूल्य तसेच आपले पारंपरिक सण-उत्सव यांच्याबद्दलची माहिती देऊन प्रॅक्टिकल शिक्षण देण्यावर भर दिला जातो. साधारण इयत्ता चौथीपासून आपल्या देशाचा इतिहास, भूगोल, परंपरा यांची माहिती दिली जाते, त्यासाठी पुस्तिकाही तयार केल्या आहेत. त्यावर छोटीशी संस्कृती ज्ञान परीक्षा सुद्धा मुलांची घेतली जाते. याशिवाय शिक्षकांसाठी वेगळी परीक्षा घेतली जाते, शिक्षकांनीही अपडेट राहावं हा यामागचा हेतू असतो. या आयामावर काम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिका छापताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत घेतलं जातं, त्यासाठी विद्वत परिषद संघटित केलेली आहे. ठाणे, पुणे, चिपळूण इथले शिक्षण तज्ज्ञ यात मदत करतात.

विद्याभारतीचं कार्य केंद्र, राज्य, प्रांतस्तरावर चालतं. महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ असे चार प्रांत आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने शिशुवािटकाचं काम सर्वच प्रांतात मोठ्या प्रमाणावर चालत. ज्या शाळांना फॉर्मल शिक्षणाबरोबरच विद्याभारतीचही शिक्षण द्यायचं असेल, अशा संस्था विद्याभारतीचा पाच आयामांचा सिलॅबस राबवतात. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कामही विद्याभारती करते.

कोकण प्रांतामध्ये अशा प्रकारच्या ३८ शिशुवाटिका सध्या कार्यरत आहेत. गोरेगाव, मालाड, ठाणे, अंबरनाथ, चिपळूण, सिंधुदुर्ग इथल्या शाळांमध्ये विद्याभारतीचं प्रशिक्षण दिलं जातं. शिशुवाटिकांबरोबरच वरच्या वर्गासाठीसुद्धा ‘समग्र विकास’ मॉडेल उभं करण्यात आलं आहे; जे अंबरनाथच्या शाळेत राबवल जात आहे. हे मॉडेल गुजरातमध्ये खूप चालतं. अंबरनाथमध्ये तर पंचकोशी शाळा चालवली जाते, म्हणजेच गुरुकुल पद्धतीप्रमाणे बारा तासांची शाळा – तीही मराठी माध्यमातून – चालवली जाते आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अगदी डोंबिवलीपासून नेरळपर्यंतचे विद्यार्थी या शाळेत येतात, असं प्रांत मंत्री संतोष भणगे यांनी सांगितलं. हे समग्र विकास मॉडेल चिपळूणमध्ये आता राबवले जात आहे. चिपळूणला एक मोठा प्रकल्प उभारत आहोत, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने नुकतच नवीन राष्ट्रीय धोरण जाहीर केलं आहे. त्यामध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा एकाच विषयाचे ज्ञान न घेता आवडीच्या वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण एकत्र विद्यार्थी घेऊ शकतो; हा एक खूप मोठा मुद्दा सरकारनं अंतर्भूत केला आहे. त्यावरही विद्याभरतीनं खूप अभ्यास केला आहे. हे धोरण पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून विद्याभारतीनं अनेक वेबिनार आयोजित केले. २०२२पासून हे धोरण लागू होणार आहे, ते धोरण नीट राबवलं जावं म्हणून विद्याभारती काम करत आहे. खरंतर, विद्याभारती पाठ्यपुस्तकी शिक्षणाबरोबर अतिरिक्त शिक्षण देत असते. तेच आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे, म्हणजे पूर्वी शारीरिक व्यायाम, योगासनं, चित्रकला, संगीत असे विषय ऑप्शनल म्हणून शिकवले जायचे, आता मात्र ते मुख्य अभ्यासक्रमाचा भाग होणार आहेत.

विद्याभारती सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे. शहरी भागांमध्ये संस्कार केंद्रांचे जाळे वाढवायचे आहे. या संस्कार केंद्रात खेळ, गाणी, सण-उत्सव साजरे करणं, त्यानिमित्तानं पालकांना एकत्र आणणे अशी कामं केली जातात तसंच वनवासी भागातही शाळांच कार्य वाढवणं यादृष्टीने काम सुरू आहे.
joshishibani@yahoo.com

(PRAHAAR)