X Close
X
9819022904

विदर्भ तापला! अकोला, नागपूरात सर्वाधिक तापमानाची नोंद


goodsambeatheat-1

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसामुळे शहरातील; तसेच विदर्भातील तापमान घसरले होते. यंदा उन्हाळ्याचा ‘फिल’च येत नसल्याची भावना विदर्भवासी व्यक्त करीत असतानाच, मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भात उन्हाळा ख-या अर्थाने सुरू झाल्याची जाणीव झाली. रविवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.९ अंश, तर नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली.

यंदा एप्रिल महिन्यातही विदर्भाला वादळी पावसाने झोपडून काढले. त्यामुळे ज्या काळात विदर्भात पारा ४५ अशांच्या आसपास पोहोचलेला असतो; त्या काळात यंदा पारा ४० अंशांच्या आसपासच होता. सततचे ढगाळ वातावरण आणि परिणामतः होणारा पाऊस यामुळे अद्याप उन्हाची ‘भट्टी’ जमलीच नव्हती. परंतु शनिवारपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली.

रविवारी विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४४.९ तर त्या खालोखाल नागपुरात ४४.२ आणि ब्रह्मपुरी येथे ४४.१ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर आणि अमरावती येथेही प्रत्येकी ४३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बुलडाणा येथे सगळ्यात कमी ४१.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात किमान तापमानही २८.३ अंश इतके होते.

मंगळवारपर्यंत अकोला, अमरावती व नागपूर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र मंगळवारी भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे उष्णतेच्या लाटेसोबतच परत एकदा वादळी पावसाचीही शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४५ अंशांच्या आसपास तापमान राहणार असले तरीसुद्धा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील आठवड्यात शहरात पारा ४६ अंशांपर्यंतही जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

(PRAHAAR)