X Close
X
9819022904

वाळू माफियांकडून कोतवालास मारहाण; १५ ब्रास वाळू जप्त


tasgaon
तासगाव : तासगाव तालुक्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला असून, मांजर्डे येथे या माफियांनी कोतवालास धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. तासगाव तालुक्यामध्ये चोरटी वाळू वाहतूक रोखण्यास तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कडक पावले उचलली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातील मंडल अधिकारी व् तलाठी यांना तसे आदेश दिले आहेत. चोरटी वाळू वाहतूक करताना कोणी सापडला, तर त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पण तरीही तासगाव तालुक्यातील चोरटी वाळू वाहतूक थांबता थांबेना. मांजर्डे येथे उमेश सुभाष मोहिते (रा मानेे वस्ती, मांजर्डे) यांचे इमारतीचे काम चालू आहे. त्या इमारतींसाठी वाळू उपसा करून इमारत चालू असलेल्या लगतच्या जमिनीवर ढीग मारलेला होता. बुधवार (दिनांक 19) रोजी पांडुरंग अर्जुन खोत, हर्षवर्धन पाटील व आनंदा शेंडगे हे उमेश मोहिते यांच्या इमारतीसाठी ट्रकने चोरटी वाळू टाकत होते. याची माहिती मंडलअधिकारी कोळी यांना मिळाल्याने त्यांनी मांजर्डे येथील तलाठी कविता सदाशिव चव्हाण यांना फोनवरून कळवले व कारवाईचे आदेश दिले. तलाठी कविता चव्हाण यांनी तलाठी कार्यालयात कार्यरत असलेले कोतवाल किरण सुरेश मोहिते यांना खात्री करण्यासाठी घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी वाळू माफिया पांडुरंग खोत, हर्षवर्धन पाटील व आनंद शेंडगे हे वाळू उतरण्याचे काम करत होते. ट्रकमधून वाळू उतरू नका, मंडल अधिकारी व तलाठी येथे येणार आहेत. असे मोहिते यांनी त्यांना सांगितले. यावेळी पांडुरंग खोत, हर्षवर्धन पाटील व आनंद शेंडगे यांनी कोतवाल किरण सुरेश मोहिते यांना धक्काबुक्की व मारहाण केली व ट्रक घेऊन ते पळून गेले. मारहाणीची माहिती मिळताच मंडलअधिकारी कोळी व तलाठी कविता सदाशिव चव्हाण दाखल झाल्या. घटनास्थळावर असलेल्या १५ ब्रास वाळूचा पंचनामा करून सदर वाळू जप्त करण्यात आली. मारहाण प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्यात आली आहे. आरोपी पांडुरंग अर्जुन खोत हर्षवर्धन पाटील आनंदा शेंडगे हे ट्रक सहित फरार आहेत. (PRAHAAR)