X Close
X
9819022904

लोव्हलिनाला कांस्य


Mumbai:

टोक्यो (वृत्तसंस्था) : बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिला जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून ०-५ असा पराभव पाहावा लागला. यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती भारताची तिसरी महिला क्रीडापटू आहे. लोव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे.

सेमीफायनल गाठल्याने पदकनिश्चिती केलेल्या लोव्हलिनाकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, जगज्जेत्या बॉक्सरसमोर तिचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र, पदार्पणात लोव्हलिनाने कांस्यपदक मिळवण्याची करामत साधली. आसामच्या २३ वर्षीय महिला बॉक्सरने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना भारताची तिसरी बॉक्सर आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. लोव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे. यापूर्वी २०१२ मध्ये एम. सी. मेरी कोम तसेच २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कांस्यपदक जिंकले.