X Close
X
9819022904

राजापूर विधानसभा मतदार संघात एकही विधायक काम नाही;राष्ट्रवादीचा आरोप


Mumbai:

प्रहार वेब टीम

राजापूर : गेल्या १० वर्षापासून लांजा-राजापूरसाखरपा विधानसभा मतदारसंघावर आमदार राजन साळवी यांनी विकासापेक्षा आपले वैयक्तिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. स्थानिक स्वराज्यसंस्थांसह अगदी राज्य आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी राजापूर विधानसभा मतदार संघाला विकासाच्या बाबतीत पूर्णपणे मागे आणि मागास ठेवण्याचे काम केले आहे. लगतच्या सर्वच मतदार संघामध्ये तेथील आमदार वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या मतदार संघाचा विकास करून एक वेगळे वलय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या दहा वर्षामध्ये राजापूर विधानसभा मतदार संघात एकही विधायक काम झालेले नसून याला शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार व आमदार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केला आहे.

पाणीटंचाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, वीज यांसारख्या सेवा सुविधा पुरविण्यातही या लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. त्यामुळे या विकासाच्या आणि रोजगाराच्या मुद्यावरच आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून आता भाकरी परतण्याची वेळ आली आहे याची जाणीवही मतदारांना झाली असल्याचे यशवंतराव यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून राजापूर लांजासाखरपा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार अजित यशवंतराव यांनी शनिवारी राजापुरात पत्रकार परिषदेत आपली भुमिका मांडली. राजापूर, लांजा तालुक्यातील जनतेला या उन्हाळ्यातही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांनाही टँकरच्या मागे धावत फिरावे लागले.

महिलांना पाच किलामीटर पायपिट करून पाणी आणावे लागले. यावेळी आमदारांनी टँकरग्रस्त प्रत्येक वाडी वस्तीचा दौरा करून ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा साधा प्रयत्न तरी करायला हवा होता, मात्र तसा तो त्यांनी केला आहे. त्यामुळे जर आमदारच निष्क्रीय असतील तर अधिकारी तरी त्यांचे कशाला ऐकतील? असा सवाल यशवंतराव यांनी केला आहे. मतदार संघातील जनतेला हा संपूर्ण उन्हाळा टँकरच्या मागे पळण्यात व्यर्थ गेला. जिल्हा नियोजन आराखड्यातून दुष्काळमुक्तीच्या कामासाठी निधी आणणे हे स्थानिक आमदारांचे कर्तव्यच आहे. पण प्रशासन कशाला म्हणतात अन लोकसेवा कशाशी खातात हेच जर माहित नसेल तर तर निधी तरी येणार कसा? आणि पाणीटंचाईचे निवारण होणार तरी कसे असा टोलाही यशवंतराव यांनी लगावला आहे. मतदारसंघातील अनेक तरूण युवक, विद्यार्थी शिक्षण व नोकरीच्या शोधात मुंबई पुणे सारख्या शहराकडे धाव घेत आहेत. तिथे देखील त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. गावाकडे सगळं आहे पण नोकरी नाही त्यामुळे मग नोकरीच्या शोधात त्याला हा संघर्ष करावा लागत आहे. आपल्या मतदार संघात नवनवीन उद्योग आणणे, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देणे हे आमदारांचे काम आहे. मात्र त्याबाबतीतही सध्याचे आमदार सफशेल अपयशी ठरले आहेत. भविष्यातील पिढीचा विचार करता मतदार संघातील विद्यार्थ्यांना नवीन शासकीय विद्यालय, अभियांत्रिकी, मेडीकल तसेच साधे शासकीय पॉलिटेक्नीकल महाविद्यालयसुध्दा आणता आलेले नाही. त्यामुळे शिक्षण, मुलभुत सुविधा, रोजगार यासारखे महत्वाचे प्रश्न कोण मार्गी लावणार हा प्रश्न मतदारांना पडला आहे. केवळ भावनिक राजकारण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम शिवसेना आणि आमदार करत असल्याचा घणाघातही यशवंतराव यांनी केला. रत्नागिरीत रहाणाऱ्यांना राजापूरकरांच्या समस्या काय कळणार? असा खडा सवाल उपस्थित करून भविष्यात मतदारांनी देखील स्थानिक आपल्या हक्काचा उमेदवार निवडून देण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या दहा वर्षामध्ये कोणतेही भरीव काम न करता विकासापासून वंचित ठेवण्याचे काम आमदारांनी केले आहे. मतदार संघातील एका वाडीपासून प्रमुख शहरापर्यंत पाणी टंचाई, विजेचे प्रश्न, रस्ते, आरोग्याच्या सोयी सुविधा यांची बोंब प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. आधी सत्ता नाही हे कारण देत ५ वर्षे जनतेची दिशाभुल केली. मात्र गेल्या पाच वर्षात राज्यात आणि दिल्लीत सत्ता असताना सुध्दा ग्रामीण व डोंगराळ भागातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न असून त्यातील एक विषयाला देखील कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा प्रयत्न झालेला नाही. आपल्या कार्यकाळात विद्यमान आमदारांनी युवकांसाठी किती नोकऱ्या आणल्या? शिक्षणासाठी किती संधी उपलब्ध करून दिल्या यावर आता आमदारांनी जनतेला उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आमदारांना आता घरचा रस्ता दाखविणे काळाची गरज असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा आहे हे मान्य आहे. मात्र राष्ट्रवादीने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. कारण आघाडीच्या माध्यमातून भविष्यात प्रत्येक जागा महत्वाची असून ती निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सन २०१४ च्या पराभवानंतर आपण सातत्याने या मतदार संघात संपर्क ठेऊन आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय आपण पक्षाला कळविला असल्याचे यशवंतराव यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पराभव व घटलेले मताधिक्य हे नवीन उमेदवार, कमी प्रमाणात मिळालेला वेळ यामुळे झाल्याचे नमूद करत काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी आपणाला लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफरही देण्यात आल्याचा गौप्यस्फोट यशवंतराव यांनी केला. मात्र आपण तो नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.