X Close
X
9819022904

राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही : संजय निरुपम


sanjay-nirupam-and-raj-t1
मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आठ दिवसापूर्वी सांगितले होते की, मनसेसोबत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही. आता मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी भूमिका एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली. निरुपम म्हणाले, राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचे कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. असेही निरुपम म्हणाले. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आठ दिवसापूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला मनसेशी आघाडी करावी असा प्रस्ताव आमच्याकडे आणला होता. परंतु सिद्धांतांत अंतर असल्यामुळे काँग्रेस पक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी कोणतीही आघाडी होणार नाही. असेही सिंघवी यांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात परंपरागत काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. आम्हाला आशा आहे की, या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी चांगली असेल. अनेक लोक म्हणतात की, येत्या काळात शिवसेनेला काँग्रेसच्या आघाडीत दाखल झालेले बघायला मिळू शकते. असे होणार नाही. हेच याचे उत्तर आहे. राज ठाकरे यांच्याप्रमाणेच शिवसेनेशीही आमचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेनेसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करण्याचा विचारही करू शकत नाही, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले होते. मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना विरोधात प्रचार केला. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मतदान करु नका असे जाहीर सभांमधून सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा असे आवाहन जनतेला केले. त्यामुळे काँग्रेस आणि मनसेची विधानसभा निवडणुकीत आघाडी होईल अशी चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, संजय निरूपम यांनी मनसेला सोबत घेणार नाही असे स्पष्ट केले. (PRAHAAR)