X Close
X
9819022904

यशची गोष्ट…


Mumbai:

रमेश तांबे

संध्याकाळची वेळ होती. यश टीव्ही बघत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, एक माशी हातावर बसली आहे. यशने तिला निरखून बघितले अन् काय आश्चर्य यश स्वतःच माशी बनला. मग काय यश भरभर बारीक झाला. सहा पाय अन् पंखवाला बनला. त्याला जरा गंमतच वाटली. सहा पायांवर उड्या मारताना, दोन पंखांवर भरारी घेताना!

यशने विचार केला आता माशी झालोच आहे, तर सारे फिरून येऊ. सगळे घर, बाहेरचा परिसर बघू. मग गूं गूं करीत यश उडाला. तो थेट बाबांच्या हातावर बसला. त्यावेळी बाबा वाचत होते. पण बाबांना हातावर माशी बसली ते कळलेच नाही. यशने बाबांना हाक मारली. हातावरून सरसर फिरला. पण बाबा आपल्याच नादात. शेवटी तो बाबांच्या नाकावर जाऊन बसला अन् मोठ्याने हसला. आता मात्र बाबांचा हात लगेच नाकाकडे गेला अन् आईला म्हणाले, ‘अगं माश्या फार झाल्यात घरात’ मग यश गेला ताईकडे. ती वह्या, पुस्तके घेऊन बसली होती. यश तिच्यासमोर वहीवरच बसला आणि हातवारे करू लागला. तेवढ्यात ताईने वहीवर हात फिरवला तोच यशच्या पाठीत जोरात धपाटा बसला. तसा यश अगदी जीव खाऊन उडाला अन् आईच्या समोरच येऊन बसला. यशने हाका मारल्या, तेव्हा आई त्याच्याकडे बघू लागली. पण तो यश आहे, हे तिला कळलेच नाही.

यशने विचार केला, घरात थांबून उपयोग नाही. थोडा वेळ बाहेर पडू, जरा मजा करू! मग यश लागला दुकाने शोधू. त्याला दिसली मिठाईची दुकाने. चटकन आत शिरून त्याने मिठाई खाल्ली. मग तो गेला रसाच्या दुकानात. तिथेही मनसोक्त रस प्यायला. खाऊन- पिऊन पोट भरले. नंतर तो कपड्यांच्या दुकानात गेला. भारीभारी कपड्यांवर खेळला, लोळला. काही कपडे आवडले पण ते त्याला घेता येईना. तिथून यश निघाला, तो थेट थिअटरमध्येच शिरला. खूर्चीत बसून सिनेमा बघितला, सिनेमा बघून खूप हसला. मग एका कारमध्ये शिरला. ड्रायव्हरच्या स्टेअरिंगवर बसून प्रवासाची मजा घेऊ लागला. पण घरघर आवाज ऐकून थोड्याच वेळात कंटाळला.

यशने ठरवले आता आपण विमानात बसायचे. आपल्याला सगळे फुकट तर आहे. मग तो टॅक्सी पकडून विमानतळावर गेला. लगेच लंडनच्या विमानात शिरला अन् सगळ्यात पुढे वैमानिकाच्या शेजारी जाऊन बसला. उंचावरून त्याला आकाशातले ढग छान दिसले. त्याने समुद्र, नद्या, डोंगर खूप बघितले. छोटी छोटी गावं आणि शहरं बघताना त्याला खूप मजा वाटली. लंडनला विमान दिवसभर थांबले. तेवढ्या वेळात यशने सारे लंडन बघितले! यश पुन्हा एकदा त्याच विमानात शिरला अन् मस्तपैकी झोपी गेला!

विमान मुंबईत उतरताच यश लगेच घराकडे निघाला. वाटेत त्याला चांगले हाॅटेल दिसले. त्यात मिठाई होती छान छान! त्याने पुन्हा एकदा त्यावर ताव मारला. तेवढ्यात मिठाईवर कुणीतरी जाळी ठेवली. मग काय यश जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याने खूपच धडपड केली. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे तो खूपच घाबरला. त्याने आईला जोरजोरात हाका मारल्या. “आई वाचव… आई वाचव!” तेवढ्यात आई धावत आली आणि यशला म्हणाली, “काय रे यश, काय झालं ओरडायला? टीव्ही बघता बघता तसाच झोपलास. स्वप्न बिप्न पडलं की काय तुला.” आता यश भानावर आला. आपण माशी नसून माणूसच आहोत, हे त्याला कळताच तो आईकडे बघून खो-खो हसत सुटला. पण यश का हसतोय? ते आईला कळलेच नाही!