X Close
X
9819022904

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव यांच्या निवडीची शक्यता


Mumbai:

मुंबई : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कार्यकाळ २१ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. २२ नोव्हेंबरला मुंबईच्या महापौरपदाची सूत्र नवीन नगरसेवकाच्या हाती येणार आहेत. दरम्यान, महापौरपदासाठी शिवसेनेतील अनेक दिग्गज नगरसेवक इच्छुक असले, तरी विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेने सत्ता स्थापन केली, तर मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे संख्याबळ पाहता, काँग्रेस पक्षाच्या पदरी उपमहापौरपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पालिकेच्या इतिहासात प्रथम स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या महिला नगरसेविकेला संधी मिळण्याची चर्चा शिवसेनेत रंगू लागली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कार्यकाळ २१ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. महापौरपदी आपली वर्णी लागावी, यासाठी शिवसेनेतील वरिष्ठ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे; परंतु यंदा महापौरपद हे विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. सोमवारी स्थायी समितीची बैठक असून, बैठकीनंतर जाधव स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देत महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते. जाधव यांचा पालिकेतील अनुभव पाहता, शिवसेना पक्षश्रेष्ठींनी जाधव यांना महापौरपदी विराजमान करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तर राज्यातील सत्ता स्थापनेत काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली, तर उपमहापौरपद काँग्रेस नगरसेवकाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक आश्रफ आझमी, आसिफ झकारिया या दोघांपैकी एका नगरसेवकाला उपमहापौरपदी विराजमान करण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विचार असल्याचेही बोलले जात आहे.

एकूणच राज्यातील समीकरण बदलले, तर महापालिकेतील सत्ता समीकरणही बदलणार हे निश्चित. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुधार, विधी, आरोग्य व काही प्रभाग समिती अध्यक्षपद जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापौरपदासाठी शिवसेना नगरसेवक उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर २२ नोव्हेंबरला पालिका सभागृह सुरू होताच, उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतो. दरम्यान, २५ वर्षांपासून पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून, राज्यातील सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ घेतलीच, तर शिवसेनेला महापालिकेतील सत्तेचा वाटा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा लागणार, असे बोलले जात आहे.

स्थायी समितीवर महिला राज

२५ वर्षापासून पालिकेत शिवसेनेची सत्ता असून, पालिकेतील सर्वात महत्त्वाची समिती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी नगरसेवकच विराजमान होत असे; परंतु शिवसेनेकडे अनुभवी नगरसेवकांची काही प्रमाणात कमतरता असल्याने यंदा स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत यांची वर्णी लागण्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणा-या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे बंड शांत करत त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देणार असल्याचे आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यामुळे राऊत अथवा श्रद्धा जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.