X Close
X
9819022904

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच


Monsoon-13RE309062018102357

मुंबई (प्रतिनिधी) : मान्सूनने यंदा वेळेआधीच हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मुंबईकरांची तहान भागणाऱ्या सातही धरणांत पावसाने अद्याप बॅटींगला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे धरण क्षेत्रात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. मात्र मुंबईकरांची तहान भागणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण सध्या १,८५, ९७१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असल्याने सध्या तरी पाणी कपात करण्याचा जल विभागाचा विचार नाही. दरम्यान, पुढील काही दिवसांत तलाव क्षेत्रात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत यंदा वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबईकरांची तहान भागणाऱ्या सातही धरणांत पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणात वरुणराजा बरसण्याची प्रतीक्षाच मुंबईकरांना आहे. मात्र सध्या सात धरणांत एकूण १ लाख ८५ हजार ९७१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असून जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका साठा उपलब्ध आहे.

त्यामुळे तूर्तास तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावलेले नाही. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. पुढील तीन महिन्यांत पावसाची दमदार हजेरी सातही धरणात लागेल आणि वर्षभराचा साठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

(PRAHAAR)