X Close
X
9819022904

महिलांच्या लोकल प्रवासाला रेल्वे बोर्डाचा ‘रेड सिग्नल’!


Mumbai:

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वच महिलांना रेल्वेमध्ये प्रवास करणं सध्यातरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महिलांना प्रवासाची मुभा देण्याची तयारी दाखवत रेल्वेला विनंती केली होती. मात्र रेल्वे विभागाने सरकारसमोर अडचणींचा पाढा वाचला असून अनेक प्रश्नांची उत्तरं मागितली आहे. त्यामुळे महिलांचा रेल्वे प्रवास हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नोकरीसाठी ऑफिस आणि कामावर पोहोचण्यासाठी महिलांना सध्या प्रचंड हालअपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे. लोकलमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि काही सरकारी कर्मचा-यांनाच प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायचं कसं असा प्रश्न त्यांना होता.

त्यामुळे महिलांना प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणीही होत होती. त्यामुळे राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवून लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र रेल्वेने सरकारला अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तर मागितली आहे.

रेल्वेने सरकारकडून किती प्रमाणात महिला प्रवासी वाढू शकतील ही आकडेवारी मागीतली आहे. इतकेच नाही तर पश्चिम रेल्वेने महिलांसाठी ट्रेन चालवण्याची कार्यपध्दती ही सरकारकडून अपेक्षित असल्याचं कळवलं आहे. त्यामुळे रेल्वे सरसकट महिलां प्रवाशांना प्रवास करू देण्यासाठी तयार नाही का? असा प्रश्न आता महिला प्रवासी विचारू लागल्या आहेत.

किती महिला प्रवासी प्रवास करू शकतील असा प्रश्न रेल्वेने विचारला याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा सगळा डेटा रेल्वेकडेच असताना त्यांनी माहिती का विचारली याबाबतही नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 700 तर मध्य रेल्वे वर 706 ट्रेन सुरू आहेत. सध्या उत्सवांचे दिवस असल्याने महिलांना प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत आहे.

‘सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलमधून प्रवास करत आहेत. आता महिलांना प्रवासाची परवानगी दिल्यास लोकल, रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे नियोजन गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही राज्य सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत,’ असं जनसंपर्क अधिकारी सुनील ठाकूर यांनी सांगितले.

‘आम्ही कालही राज्य सरकारशी बोललो. आम्ही अधिकच्या लोकल गाड्या चालवण्यास पूर्णपणे सज्ज आहोत. पश्चिम रेल्लेनं लोकल फे-यांची संख्या ७०० पर्यंत वाढवली आहे. यामध्ये २ महिला विशेष लोकलचा समावेश आहे. मध्य रेल्वेनंसुद्धा लोकल फे-यांची संख्या ७०६ पर्यंत वाढवली आहे. महिलांना प्रवासास परवानगी दिल्यास गर्दी वाढेल. तिचं नियोजन कसं करणार याबद्दल आम्ही राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. त्याबद्दल सरकारकडून माहिती येणं बाकी आहे,’ असं ठाकूर यांनी पुढे सांगितलं.