मागील लेखात आपण शारीरिक कौशल्य (बॉडीली इंटिलिजन्स) या वैशिष्टय़ाबाबत माहिती घेतली आणि ती विकसित कशी करावी याबाबतही काही सोप्या उपायांची माहिती घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत भाषिक (लिंग्यूस्टीक इंटिलिजन्स)बाबत.
मातृभाषे व्यतिरिक्त इतर भाषा आत्मसात करण्याची कला, व्याकरण, व्यक्त होण्याची क्षमता, शब्ब्दफेकी, लिखाण, कथाकथन, संवाद साधण्याची कला, संभाषण कौशल्य. ही मुले किंवा व्यक्तींची वैशिष्टय़े आहेत.
आज स्पर्धेच्या आणि इंटरनेटच्या युगात संवाद क्षमता असणे अतिआवश्यक झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी व्यक्त होता येणे अनिवार्य आहे.
भाषिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींचे शब्दांवर प्रचंड प्रेम असते. वाचन आणि लेखन यामध्ये त्याचे मन रमते. विविध भाषा शिकण्यामध्ये या व्यक्तीना प्रोत्साहित केल्यास ते बहुभाषिक वा भाषातज्ज्ञ होऊ शकतात. या व्यक्ती शब्दांमधील अथवा वाक्यामधील जटिलतेमध्येही आनंद मिळवितात. शब्दांचे अर्थ आणि उच्चार याबाबत त्यांना प्रचंड कुतूहल असते. कठीण शब्दरचनेचा उलघडा करून ती सहज सुंदर बनविणे यात त्यांना आनंद मिळतो. या यक्तीकडे शब्दांचे भांडारच असते.
शालेय जीवनात या वैशिष्टय़ांच्या व्यक्ती भाषेतील, लेखनातील, सवांद साधण्याच्या कलेमध्ये विशेष प्रावीण्याच्या जोरावर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहतात. उत्तम श्रोता बनून व्याख्याने किंवा वाचनात आलेल्या प्रत्येक शब्दरचनेची नोंद करणे आणि त्याचा योग्य वापर करणे यात त्यांना विशेष रुची असते. आपण आत्मसात केलेले ज्ञान वाटण्यात अशा व्यक्तींना आनंद मिळतो. आपल्या लेखणीच्या किंवा शब्दफेकीच्या जोरावर श्रोत्यांना, वाचकांना मोहीत करण्यावर अशा व्यक्तींचा प्रयत्न असतो.
लेखक, निवेदक, वकील किंवा कायदेतज्ज्ञ, विनोदी कलाकार, संपादक, पत्रकार, कॉपी रायटर, व्याख्याता, शिक्षक, अनुवादक, दुभाषी, भाषातज्ज्ञ अशी अनेक क्षेत्र या व्यक्तींसाठी करिअर निवडण्याच्या दृष्टीने योग्य आहेत.
भाषिक(लिंग्युस्टिक इंटीलिजन्स) या वैशिष्टय़ाला अजून बळकटी देण्याकरिता काही सहज सोपे उपाय आहेत.
>> शब्द कोडी सोडविणे.
>> लेखन किंवा कथाकथन यावरील कार्यशाळेत सहभागी होणे.
>> चांगल्या प्रतीचे वर्तमानपत्र नियमित वाचणे.
>> कथाकथन किंवा सादरीकरण यासारख्या उपक्रमांमध्ये भाग घेणे.
>> रोजनिशी लिहिणे.
>> धमार्दाय संस्थांच्या माध्यमातून अशिक्षित लोकांना शिकविणे.
>> समूहामध्ये पुढाकाराने कथाकथन किंवा नकला करून दाखविणे.
>> नियमित ग्रंथालयात अथवा पुस्तके विकत घेऊन वाचन करणे.
अभ्यासू वक्ता, लेखक, पत्रकार, नकलाकार हा जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो. जगाला आपलेसे करण्याची अद्भुत जादू या व्यक्तींचे शक्तिस्थान असते. पुढच्या लेखात आपण अजून काही वैशिष्टय़ांची माहिती आणि उपाय याबाबत माहिती घेणार आहोत.
(PRAHAAR)