नवी दिल्ली : नेदरलँड, इंग्लंड आणि तुर्कीपाठोपाठ आता भारतानेही बोइंग ७३७ मॅक्स विमानांवर बंदी घातली आहे. इथियोपियात बोइंग ७३७ मॅक्स विमान कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे भारताने या विमानावर बंदी घातली आहे.
रविवारी इथियोपियन एअरलाइन्सचे बोइंग ७३७ मॅक्स हे विमान राजधानी ‘आदिस अबाबा’ जवळ कोसळले. या दुर्घटनेत १५७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात चार भारतीय होते. बोइंग ७३७ मॅक्स या विमानाची ही पाच महिन्यातील दुसरी दुर्घटना आहे. या विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड असल्यामुळे हे अपघात होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युरोपातील अनेक देशांनी या विमानाच्या वापरावर बंदी घातली आहे.
जोपर्यंत या विमानातील समस्येचे समाधान निघत नाही तोपर्यंत आम्ही ही बंदी उठवणार नाही, अशी माहिती नागरी विमान मंत्रालयाने दिली आहे. सर्वाधिक ७३७ मॅक्स विमान स्पाइसजेट एअरलाइन्सकडे आहेत. पण नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याचे जाहीर करत त्यांनीही या विमानांचा वापर बंद केला आहे.
आशियातील सिंगापूर, मलेशिया आणि ओमान या देशांनीही या विमानावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर चीन आणि इंडोनेशियाने घरगुती एअरलाइन्सला या विमानाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशांनीही बोईंग ७३७ मॅक्स विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. सिंगापूरने तर बोईंग ७३७ मॅक्स या विमानांना त्यांच्या देशातील हवाई हद्दीचा वापर करण्यावरही निर्बंध घातल्याने त्याचा फटका हवाई वाहतुकीला बसण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे अमेरिकेने बोईंग ७३७ मॅक्स या विमानासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील दोन हवाई वाहतूक कंपन्या या विमानांचा वापर करतात. इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमान अपघाताचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. यासंदर्भात सखोल तपास केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे अमेरिकी हवाई प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
()