X Close
X
9819022904

प्रकाश मेहता यांच्यासह या ‘सहा’ नेत्यांना फडणवीस सरकारमधून डच्चू


Mumbai:

अजय गोरड : प्रहार वेब टीम

मुंबई : अखेर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी ११ वाजता पार पडला. यात १३ नेत्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भाजपच्या कोट्यातील आहे. आज भाजपच्या १०, शिवसेनेच्या दोन नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.

एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह आदिवासी मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राजे अत्राम, प्रविण पोटे आदी सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

आज सकाळी राजभवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी १३ मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात ८ कॅबिनेट मंत्र्यांचा तर ५ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके या सहा नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत या दोघांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली तर, भाजपकडून योगेश सागर, संजय ऊर्फ बाळा भेगडे, परिणय फुके आणि अतुल सावे या आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.