X Close
X
9819022904

पाण्यासाठी कारखानदार आक्रमक


01BGH_WATER_1772458f

डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवलीतील ४५० कारखान्यांना गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयावर गुरुवारी कारखानदारांनी कामा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. कारखान्यांना मुबलक पाणीपुरवठा करा, अन्यथा सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असा इशारा संघटनेने दिला. दरम्यान लवकरच योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता आर. पी. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

डोंबिवली फेज-१ आणि फेज – २ मध्ये ४५० कारखाने आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या सर्व कारखान्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कामा संघटनेने या समस्येसाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. त्याला उत्तर न मिळाल्याने अखेर जाब विचारण्यासाठी कारखानदारांनी कामा संघटनेच्या नेतृत्वात एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अभियंता आर. पी. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कारखाने चालविण्यासाठी मुबलक पाणी मिळणे आवश्यक असते मात्र कमी दाबाने पाणी येत असल्याने कारखाने चालविणार तरी कसे असा प्रश्न आहे. पाणी लवकरात मिळाले नाही तर सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असे कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी सांगितले. कारखानदार हेमंत भिडे म्हणाले, पाणी वितरण व्यवस्थेत समानता नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे.

याला जबाबदार कोण यापेक्षा सर्व माहिती कशी मिळेल याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी एमआयडीसीचीच्या नवीन पाण्याच्या लाइनचे काम सुरू आहे. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणीमुळे लाइनचे काम संथगतीने सुरू होते. मात्र आता कामाला गती मिळाली असून महिनाभरात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होईल, असे सांगितले.

(PRAHAAR)