वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूने भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट करण्यावर भर देण्यात आला. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात झालेल्या बैठकीत कोरोना महामारीच्या आजारावर चर्चा करण्यात आली.
हॅरिस यांनी कोरोना संकटात अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या मदतीचा उल्लेख करत कठीण काळात अमेरिकेने भारताला मदत केली असल्याचे म्हटले. भारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना आम्ही आवश्यक ती मदत करू शकलो, याचे समाधान आहे. कोरोना लसीकरणातही आम्ही मदत केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिकेने केलेल्या मदतीचा उल्लेख करत अमेरिका चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने केलेली मदत ही एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणेच होती, असेही मोदी यांनी सांगितले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी भारतात वेगाने सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावर आनंद व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांच्या भेटीत लोकशाहीच्या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. हॅरिस यांनी कोणत्याही देशाचा उल्लेख न करता म्हटले की, जगात लोकशाही धोक्यात आली आहे. अशा वेळी भारताने सोबत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सकारात्मक परिणामासाठी भारताचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे हॅरिस यांनी सांगितले.
या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पुरवठा साखळी आणि नवीन तंत्रज्ञान आदी मुद्दे भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले. भारत आणि अमेरिकेचे संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील असेही मोदी यांनी म्हणाले.
भारत भेटीचे आमंत्रण
पंतप्रधान मोदी यांनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले आणि हॅरिस यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती होणे ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदी यांनी हॅरिस यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.
(PRAHAAR)