X Close
X
9819022904

निराकाराची साकार रूपात अनुभूती!


ganpati-flower-backgrounds-

गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे, ही एक अद्वितीय अशी कला आहे, ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे. आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की, त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे, जेणेकरून आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठरावीक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की, ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.

ठरावीक दिवसांनंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातून आपल्याला हे कळते की, ईश्वर मूर्तीमध्ये नाही. तो तर आपल्यातच आहे. अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे, हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे. गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे. श्री गणेश हा आपल्यातील अनेक चांगल्या गुणांचा देव आहे. आपण जेव्हा त्याची पूजा करतो, तेव्हा ते गुण आपल्यातही खुलू लागतात. जिथे जडता असेल, तिथे ना ज्ञान असते, ना बुद्धी असते, ना प्रगती. त्यामुळे चेतनेला जागृत करणे आणि चेतनेचा अधिकार जाणणे म्हणजेच गणेश आहे. आपल्यातील हीच चेतना जागृत व्हावी म्हणूनच प्रत्येक पूजेच्या आधी गणेशाची पूजा केली जाते.

अशाप्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेश तत्त्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.

आदिशंकराचार्यानी याचा अर्थ फार सुंदर रीतीने सांगितला आहे. श्रीगणेश जरी गजमुख म्हणून माहीत असला तरी, तो परब्रह्माचे रूप आहे. गणेशाचे वर्णन ‘अजन्मा, निर्विकल्पं, निराकार रूप’ असे केले जाते.

तो अजन्मा आहे, म्हणजेच ज्याचा जन्म झाला नाही असा, तो निराकार आहे, म्हणजेच आकाररहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे. तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतीक आहे. गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे. ज्याच्यामुळे सर्व गोष्टींना आकार मिळतो आणि अशी ऊर्जा आहे, ज्यात सारे विश्व सामावलेले आहे. गणेश बाहेर मूर्तीत नसून, तो आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. पण, हे अतिशय सूक्ष्म ज्ञान आहे. प्रत्येक निराकार गोष्ट साकार रूप घेऊ शकत नाही, हे आपल्या प्राचीन श्रषी-मुनींना माहीत होते. सामान्य जनतेला हे समजावे म्हणून त्यांनी त्या निराकार श्रीगणेशाला साकार रूप दिले. बराच काळ साकार रूपाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना निराकाराचा अनुभव येऊ लागतो.

अशाप्रकारे निराकार गणेशाला आदी शंकराचार्यानी आपल्या प्रार्थनेतून आकार दिला आणि निराकार गणेशाचा संदेशही दिला. अशाप्रकारे आकार हाच आरंभीचा बिंदू आहे, जो निराकार चेतनेपर्यंत पोहोचवतो.

(PRAHAAR)