मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचे भाजपकडून राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजप नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. याशिवाय इच्छुकांचीदेखील मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडे जास्त संख्याबळ असल्याने काही उमेदवारांना सहज विधान परिषदेवर पाठवता येईल. त्यामध्ये पंकजा यांचे आघाडीवर असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्याने पंकजा पक्षावर नाराज आहेत. त्या पक्षांतर करणार असल्याची चर्चादेखील सुरू होती. पक्षातल्या इतर नाराज नेत्यांसोबत त्यांनी भगवानगडावर समर्थकांचा मेळावादेखील घेतला. त्यात त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या याच नाराजीची पक्षाने दखल घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग मराठवाडय़ात आहे. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या त्या भाजपमधल्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. अनेक वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री म्हणून काम केल्याने त्यांच्याकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला विधान परिषदेत सत्ताधा-यांना रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो, असे भाजपमधल्या नेत्यांना वाटते.
(PRAHAAR)