लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या प्रेमात पडला आहे. विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर जडेजाकडे नेतृत्व सोपवावे, असे त्याला वाटते.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जडेजाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तसेच चार झेलही पकडले. चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी सहज पराभव केला. क्रिकबझवर झालेल्या संभाषणादरम्यान मायकेल वॉन म्हणाला, ”तुम्ही म्हणाल, की धोनी आणखी २-3 सामने खेळणार आहे, पण खरे सांगायचे, तर तो यापुढे खेळणार नाही. माझ्या मते, रवींद्र जडेजा असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या भोवती एक टीम तयार केली पाहिजे. माझ्या मते तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये जबरदस्त आहे. त्याची मानसिकताही चांगली आहे.”
मायकेल वॉनच्या म्हणण्यानुसार, रवींद्र जडेजा आघाडीच्या चार फलंदाजांमध्येही फलंदाजी करू शकतो. प्रतिस्पर्ध्याला समोर ठेऊन तो गोलंदाजीचीही सुरुवात करू शकतो. वॉन म्हणाला, जडेजा हा एक असा फलंदाज ज्याला आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकतो. आपण त्याच्याकडून गोलंदाजीची सुरुवातही करू शकता. तो इतका महान क्रिकेटपटू आहे, की तो ही जबाबदारी स्वीकारू शकतो.
धोनीच्या सल्ल्याने जडेजाने बटलरला केले आऊट
मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयात चेन्नईसाठी जोस बटलरची विकेट महत्त्वपूर्ण ठरली. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने धोनीच्या सल्ल्याने त्याला बाद केले. बटलरच्या खेळीमुळे राजस्थान आव्हानाचा त्वेषाने पाठलाग करत होता. डावातील दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. तो नो बॉल होता. यानंतर चेंडू बदलावा लागला. नव्या चेंडूबद्दल धोनीने जडेजाला एक सल्ला दिला. धोनी जडेजाला म्हणाला, चेंडू कोरडा आहे, वळेल.” यानंतर जडेजाने बटलरला चेंडू टाकला. तो बटलरला कळायच्या आत त्याची यष्टी घेऊन गेला आणि इथेच सामना फिरला. बटलरनंतर राजस्थानचा डाव गडगडला.