X Close
X
9819022904

तरुण पिढीला कोरोनाचा विळखा


Mumbai:

मुंबई : वयोवृद्ध व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून आता तरुण पिढी कोरोनामुळे बाधित होत असल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर आली आहे. २० ते ४० वयोगटातील तब्बल १ लाख ९६ हजार १७८ तरुण कोरोनामुळे संक्रमित झाल्याचे पहावयास मिळत आहे. तरुण पिढी कोरोनामुळे बाधित होत असून ४१९ तरुणांनी जीव गमावल्याचे पालिकेच्या आकडेवारी वरुन समोर आले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही कोरोनाच्या विळख्यात मुंबईकर अडकला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका तरुण पिढीला असून २० ते २९ वयातील ८७,००१ तरुणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत १२९ तरुणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. तर जीवघेणा कोरोनाचे ३० ते ३९ वयातील तरुण शिकार होत असून आतापर्यंत १ लाख ९ हजार १७७ कोरोना बाधित झाले आहेत. तर ३८० तरुणांच्या जीवावर बेतले आहे. कोरोनाची दुसरी लाट मुंबईत धडकली असून या दुसऱ्या लाटेत तरुण पिढी सर्वाधिक कोरोना बाधित होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियम पाळा कोरोना टाळा या पालिकेच्या आवाहनाला खास करुन तरुण वर्गाने आता तरी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

मुंबईत ११ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्या वेळेपासून कोरोना विरोधातील लढा सुरुच आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोना विषाणूबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून मुंबईत आजही कोरोनाचा कहर पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोनाची लागण ही वयोवृद्धांनाच होत असल्याचे समोर आले होते. परंतु कोरोना आपले रुप बदलत आहे तसा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून ही मुंबईकरांसह आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे.