मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ‘मी टू’ चळवळी अंतर्गत तनुश्रीने मोहिम चालवली होती. नाना पाटेकर यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची चर्चा गेल्या काही तासात रंगल्या असताना तनुश्रीने यावर प्रतिक्रीया दिली आहे.
पोलिसांना अद्याप कुणीही साक्षीदार मिळालेले नाहीत. अशावेळी गुरुवारी नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चीट देण्याच्या चर्चा होत आहेत. पोलिसांकडून असे कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. त्यामुळे या चर्चा निराधार असल्याचे तनुश्री म्हणाली आहे.
तनुश्रीने नानांविरोधात कायदेशीररित्या गुन्हाही दाखल केला होता. ही एफआयआर दाखल होऊन आता सात महिने उलटले आहेत. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, नाना पाटेकर यांच्या टीमकडून मुद्दाम अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. ‘खरं हेच आहे की नाना पाटेकरांच्या टीमनं खोट्या बातम्या पसरवल्यात. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. अद्याप मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही. माझे वकील नितीन सातपुते यांनी या गोष्टीची पडताळणी करून मला ही माहिती दिली आहे’ असं तनुश्रीनं म्हटलंय. नानांची इमेज पूर्ववत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांना काम मिळणं बंद झाल्यानं नाना पाटेकर यांची पीआर टीम या खोट्या अफवा पसरवत असल्याचंही तनुश्रीनं म्हटलंय.
(PRAHAAR)