अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर ३३ जणांनी गेल्या ९ महिन्यांपासून विविध ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली आहे. उर्वरित १० आरोपीचा शोध सुरू असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणे सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले करत आहेत.
डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती. या ओळखीतून त्यांच्यात जानेवारी २०२१मध्ये शारिरीक संबध निर्माण झाले. मात्र, या तरुणाने या दरम्यान तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार करत या व्हिडीओच्या आधारे या तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर मित्रांसमवेत या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मागील ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३३ जणांनी पीडितेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर या विविध ठिकाणी तिला नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
यातील ७ आरोपींनी दोन दिवसापूर्वी पीडितेला वडवली येथे नेऊन तिच्यावर एकाच वेळी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितल्यावर तिची आई हादरून गेली आणि तिने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडितेला उपचारांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष अधिवेशनाची मागणी गैर होती का? : चित्रा वाघ
डोंबिवली येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची लांच्छनास्पद घटना घडली. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी संजय राऊत आता कोणाचे थोबाड फोडायचे ते सांगा, असा सवाल उपस्थित करत ‘फास्ट ट्रक’वर असणाऱ्या महत्वाच्या खटल्याचे निकाल देखील अजून प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भाजपतर्फे केलेली महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी रास्त होती की गैर? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत या घटनेचा जाहीर निषेध केला.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना : निलेश राणे
डोंबिवली भोपर मध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुन्हा घडली आहे, अशी प्रतिक्रीया प्रदेश भाजप सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
‘स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा’
महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महिलांवर अत्याचार होतोय ही दुख:द बाब आहे. गेल्या २ महिन्यांपासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यावर साम, दाम, दंड भेद कुठल्याही प्रकारे तडा आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे?’ असा सवाल अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
त्या म्हणाल्या की, बलात्कारी विचारांना ठेचायला हवं. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी जे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं त्यात त्यांनी २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा असं सूचवलं.
सरकारने आतातरी गांभीर्याने लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने आतातरी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. डोंबिवलीतील घटनेबद्दल समजताच फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कल्याणमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
कल्याण : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची.
काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. दरम्यान तिची आई शिकवणीला जायला सांगत तेव्हा ती रडायला सुरुवात करायची. त्यातून या घटनेला वाचा फुटली.
(PRAHAAR)