वुहान (वृत्तसंस्था) : चीनमधील वुहान शहरामधील मांसविक्री केल्या जाणाºया बाजारपेठेमधून प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. जगभरातील १८३ देशामध्ये कोरोनाचा विषाणू पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने ३१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र असत असतानाच चीनमध्ये मात्र परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. म्हणूनच तेथील सरकारने आता मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा वटवाघूळ, कुत्रा, मांजरी, सशांचे मांस विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
या बाजारपेठा सुरु होताच येथे नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचेही वृत्त आहे. वटवाघूळ आणि खवल्या मांजराच्या मांसांमधून कोरोनाचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचा अंदाज काही संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लॉकडाउनच्या माध्यमातून घरी बसलेले असताना दुसरीकडे चीनने मांसविक्री सुरु करण्याची पवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, चीनच्या नैऋत्येकडील गुझलीन शहरामधील मांसविक्रीची बाजारपेठ सुरु झाल्यानंतर तेथे हजारो ग्राहकांनी गर्दी केली. येथे अनेक जनावरांना पिंजऱ्यामध्ये बंद करुन विक्रीसाठी आणले जाते. अनेकांनी येथे कुत्र्याचे तसेच मांजरीचे मांस विकत घेतले. तसेच दक्षिण चीनमधील डोंगगुआन येथील मांसविक्री करणाऱ्या बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. येथे असणाऱ्या पारंपारिक चीनमधील पारंपरिक औषधे विकणाऱ्या दुकानांबाहेर वटवाघूळ, विंचू यांच्या अवयवांपासून बनवण्यात आलेली औषधे उपलब्ध आहेत, असे फलक लावण्यात आले आहेत.