X Close
X
9819022904

गणपतीसाठी कोकणात जाणा-यांसमोर अडचणी; बकरी ईदसाठी मात्र सुविधा : मनसेची टीका


rahul-gandhi

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात कोकणात जाणा-या चाकरमान्यांना देण्यात येणा-या सुविधांवरून मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांना येणा-या अडचणी अद्यापही दूर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, बकरी ईदसाठी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी टीका मनसेने केली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे. चाकरमानी दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांना कोकणात जाण्यासाठी सरकारने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. परराज्यातील लोकांसाठी मात्र, त्यांना गावाला जाण्यासाठी व्यवस्था केली. ते लोक परराज्यात जाऊनही आले, असं सांगतानाच आता बकरी ईद येतेय. त्यासाठी सरकारने सर्व सोयी सुविधा दिल्या आहेत. पण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी काहीच सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. हे योग्य नाही, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

राज्य सरकारने कोकणात जाणा-यासाठी बसेस आणि रेल्वेची व्यवस्था केली पाहिजे. त्याबाबतचं नियोजन करून त्याची माहिती जाहीर केली पाहिजे. जर शासनाला बसेसचं नियोजन करता येत नसेल तर तसं सांगावं. मनसेच्या वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी बसेसचं नियोजन केलं जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

यापूर्वी भाजपचे नेते नारायण राणे यांनी यापूर्वी कोकणबंदी करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. गणपतीत कोकणात येणा-या चाकरमान्यांना प्रवेश नाकारल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करून असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यानंतर गणेशोत्सवात कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या नियोजनासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलावलेल्या बैठकीवरून वाद झाला होता. या बैठकीतून राणे पिता-पुत्रांना डावलण्यात आले होते. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली होती. ही शिवसेनेची बैठक आहे की कोकणमधील लोकप्रतिनिधीची? असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच कोकणात कोरोनाचा फैलाव झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

(PRAHAAR)