खेडमध्ये चोरटे पुन्हा सक्रिय : एकाच रात्रीत पाच बंगले, २ फ्लॅट फोडले
खेड : खेडमध्ये चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एकाच रात्रीत शहरालगत असलेल्या खोंडे आनंदनगर येथील बंद अवस्थेत असलेले ५ बंगले व मयुरेश अपार्टमेंटमधील २ फ्लॅट रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्यात आले. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र एक दुचाकी चोरून नेण्यात चोरट्याने यश आले. उन्हाळी सुट्टीनिमित्त अनेकजण आपल्या मूळ गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी खोंडे आनंद नगर येथील संदीप घाणेकर, नंदकुमार घाणेकर, डॉ गोरत, बाळासाहेब यादव व किशोर देसाई यांचे बंद असलेले बंगले फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने त्यांनी आपला मोर्चा याच परिसरात असलेल्या मयुरेश अपार्टमेंट येथे वळवत या इमारतीतील संदीप सावंत व यशवंत बंदरकर यांच्या फ्लॅटकडे वळवला. याठिकाणी देखील चोरट्याच्या हाती काही लागले नाही. इमारतीच्या आवारात उभी करून ठेवण्यात आलेली बबन रामचंद्र जाधव यांच्या मालकीची सुमारे ४० हजार रुपये किमतीची दुचाकी मात्र चोरट्यानी चोरून नेली. सोमवारी या सर्व चोऱ्या उघड झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षका सुवर्णा पत्की आपल्या सहकाऱ्या समवेत दाखल झाल्या .या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PRAHAAR)