मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर रेव्ह पार्टीदरम्यान सापडलेल्या ड्रग्जच्या प्रकरणात आता अनेक नवे खुलासे पुढे येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण वाढत जाण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर हे संपूर्ण प्रकरण हायप्रोफाईल झाले आहे. त्यामुळे एनसीबी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. एनसीबीने स्पष्टपणे सांगितले आहे की, तपास अद्याप संपलेला नाही. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मंगळवारी क्रूज ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. क्रूझवर पार्टी आयोजित करण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्व परवानगी मागितली गेली नव्हती, असा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. ‘क्रूझमधील पार्टीबद्दल मुंबई पोलिसांना कोणतेही लेखी पत्र किंवा सूचना देण्यात आलेली नाही. मुंबई पोलीस क्रूझ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याशी बोलून क्रूझला कोणत्या प्रकारची परवानगी देण्यात आली होती आणि ती कोणी दिली होती आहे हे जाणून घेईल असे’, पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच कोविड -१९ च्या नियमांमुळे सध्या महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने, कलम १४४चे उल्लंघन झाले आहे की नाही, याचीही मुंबई पोलीस चौकशी करेल. कोरोनामुळे राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे, ज्या अंतर्गत पाचपेक्षा जास्त लोकांना एकाच ठिकाणी एकत्र येण्याची परवानगी नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, पार्टीला परवानगी देण्यामध्ये अनेक संस्था सहभागी आहेत. ‘कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा पार्टीसाठी, मुंबई पोलिसांना कळवावे लागते. तपासानंतर, आम्हाला काही उल्लंघन झाल्याचे आढळल्यास, मुंबई पोलिस गुन्हा नोंदवणार आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) क्रूझच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी दुसरा समन्स पाठवले आहे. एनसीबीने जेव्हा छापे टाकले गेले तेव्हा २ ऑक्टोबरचे वेळापत्रक जाहीर करण्यास सांगितले आहे. यामध्ये क्रूझवरील प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, खोली क्रमांक, त्यांच्या ओळखपत्राचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती असणार आहे. पोलिसांनी त्याच दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही मागितले आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या या सर्वांवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप एनसीबीने केला असून त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेक खळबळजनक खुलासे झाल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे. ड्रग्ज पुरवठादार आणि ग्राहकांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करायचा असल्याने सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे, असा दावा एनसीबीने सुनावणीदरम्यान केला. आर्यनच्या चॅटमधून अनेक आश्चर्यचकित करणारी माहिती हाती आली आहे. आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांचे व्हॉट्सएप चॅट आंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडे इशारा करत आहेत, असा दावासुद्धा एनसीबीने न्यायालयात केला. चॅटमध्ये आर्यन ड्रग्जसाठी पेमेंट केल्याचे सांगत आहे. त्यामध्ये तो कोडवर्डचा वापर करत आहे. सर्व आरोपींच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची गरज आहे. याप्रकरणी जुहूच्या एका ड्रग्ज पुरवठादाराला अटक केली असून, त्याच्याकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले.
(PRAHAAR)