X Close
X
9819022904

कोल्हापूर-सांगलीमधील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी


shivaji-vidhyapith

कोल्हापूर : पूरग्रस्त कोल्हापूर-सांगलीमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याची मागणी होत होती. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने ही मागणी मान्य करत अखेर कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील ४४९ पूरग्रस्त गावांमधील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाकडे ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची यादी आली असून या विद्यार्थ्यांच्या शुल्कपोटीची अंदाजे एक कोटीची रक्कम विद्यापीठ स्वनिधीतून भरणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

परतीच्या आणि बिगर मौसमी पावसाने राज्याला चांगलेच झोडपले. राज्यातील कित्येक जिल्ह्यातील शेतक-यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले, तर सांगली-कोल्हापूरमध्ये त्याआधीच पूर आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी उचलून धरली. ही मागणी विद्यापीठाने मान्य करत अशा विद्यार्थ्यांना दिलासा दिला, तर त्यापाठोपाठ पुराचा फटका बसलेल्या कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाने सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी अशी मागणी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठानेही ही मागणी मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अखत्यारित येणा-या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा-या तसेच विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील पूरबाधित विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सप्टेंबरपासून हाती घेण्यात आले होते. याअंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना पूरबाधित विद्यार्थ्यांचे तपशील देण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले होते.

दरम्यान, ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या सत्रपरीक्षांची फी पूरबाधित विद्यार्थ्यांसाठी माफ करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आला. हा विषय मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत मांडून त्याला मंजुरी घेण्यात आली. प्राथमिक अहवालानुसार पूरबाधित विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार असल्याचे निदर्शनास आले. मात्र महाविद्यालयांकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांबाबत येत असलेल्या माहितीनुसार पूरबाधित विद्यार्थ्यांचा आकडा ५० हजारांच्या घरात जाणार असल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबरमध्ये सुरू होत असलेल्या परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख उलटून जाऊ नये, यासाठी ज्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केले आहे, त्या विद्यार्थ्यांना रकमेचा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी फीची रक्कम भरली आहे त्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या स्वनिधीतील एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, असे नामकरण करा
कोल्हापूर : कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले आहे.

शिवाजी विद्यापीठ असे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे नाव आहे. तर अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख सर्वत्र केला जावा असे म्हणत त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराची मागणी केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक मराठा तरुणांवर गुन्हे मागे घेण्याची मागणीही संभाजीराजे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या नामोच्चारावरून अनेक चर्चा होत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन प्रकरण आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे अलीकडील काळात घडलेली उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नामविस्ताराचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

(PRAHAAR)