X Close
X
9819022904

कोरोनामुळे राज्यनाट्य स्पर्धा घेणं अयोग्य – अमित देशमुख


Corona-0980E07052021052059

संजय कुळकर्णी

राज्यनाट्य आणि व्यावसायिक नाट्यस्पर्धा घेणारं की नाही या संभ्रमात सध्यातरी रंगकर्मी आहेत. व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सांगता होण्याआधीच लॉकडाऊन झाला आणि प्राथमिक फेरीतील ४ ते ५ नाटकं सादर व्हायची बाकी आहेत. ती होऊ शकत नाहीत कारण नाट्यगृह बंद आहेत. त्यात एका प्रयोगासाठी निर्माते त्यांच्या नाटकांचे प्रयोग करतील का? हा सुद्धा प्रश्न आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद असताना ती आता कधी उघडणार याकडे निर्माते, कलाकार मंडळी या आशेकडे डोळे लावून बसलेली आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरील मंडळी त्यांच्या नाटकांना तरी प्रयोग सादर करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडं घातलेले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याबद्दल आपली मतं मांडली. त्यांच्या एकंदरीत व्यक्तव्यावरून स्पर्धा या घेणं सध्याच्या कोरोनाच्या काळात शक्य नाही आणि नाट्यगृह सुद्धा उघडतील की नाही? याबद्दल ते साशंकच आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, “जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत शक्यता कमी आहे. तिसरी लाट येण्याची भीती आहे. स्पर्धा समजा आता घेतल्या तर त्याची तयारी करणं, सराव करणं, अनेक ठिकाणी कलाकरांना एकत्र यावं लागतं या सगळ्या अडचणी येऊ शकतात. म्हणून स्पर्धा घेणं सयुक्तिक नाही. काहीजण स्पर्धा ऑनलाईन घ्या म्हणतात, पण त्यालाही सराव करावा लागतो. सांस्कृतिक विभागाचा आपत्ती व्यवस्थापक विभाग आहे, त्याच्या निकषात या बाबी बसत नाहीत. लसीकरणाचा टक्का वाढेल आणि कोरोना नियंत्रणात येईल त्यावेळी त्याचा विचार करण्यात येईल. व्यावसायिक नाट्यस्पर्धा सुद्धा त्यामुळे होणार नाहीत. नाट्यगृहांनी नाट्यगृह उघडण्यासाठी आणि नाट्य प्रयोगांना सुद्धा तेच निकष असतील.

“व्यावसायिक नाट्यसृष्टीला सांस्कृतिक विभागाकडून अजूनपर्यंत कसलीच मदत मिळालेली नाही असे बोलले जातंय या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणाले, “आपण वृद्ध कलावंतांना मदत करतोच की. रंगकर्मींची यादी शासनाकडे नाही. त्यांच्या संघांकडे ती असेलही. ती यादी प्रमाणित करावी लागते. अधिकृत करावी लागते. तशी आजपर्यंत गरज पडली नाही. त्यामुळे तशी काही व्यवस्था नाही आहे. त्यासंदर्भात त्यांना मदत झाली पाहिजे हा विचार शासनाचा आहे. त्याची काही मार्गदर्शक तत्त्व आहेत त्याबद्दल प्रक्रिया सुरु आहे. कलाकार, रंगकर्मी आणि नाट्य – चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची नोंदणी विहित नमुन्यात होणं गरजेचं आहे. शासन त्याबाबतीत सूचना जारी करेल. मदत करावी या भूमिकेत आम्ही आहोत. सर्व घटकांबरोबर चर्चा या झाल्या. अजून सुरु आहेत. बैठका सुद्धा झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर सुद्धा चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा करू आणि नंतर मंत्रिमंडळाच्या सभेत हा मुद्दा चर्चिला जाईल. नंतरच निर्णय हा घेण्यात येईल.”

दोन महिन्यांपूर्वी शासनाने कोरोनाच्या जनजागृतीसाठी लोक कलावंतांकडून गावोगावी कार्यक्रम सादर करण्यासाठी जी. आर. काढला होता. त्यासाठी लोककलावंतांना त्यातून मानधन मिळणार होतं. परंतु ते कार्यक्रम सादर झालेच नाहीत अशी चर्चा व्यावसायिक वर्तुळात होती. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, “आरोग्य विभागाने त्या संदर्भात भरीव कामे केली आहेत. आरोग्य विभागाने त्यांना सामावून घेतले होते. आता लोक कलावंतांकडून ते करताना परत कोरोनाचे नियम लागू होतात. त्यामुळे ते शक्य झालं नाही” सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि सह संचालिका मीनल जोगळेकर यांनीसुद्धा राज्यनाट्य स्पर्धेबाबत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याबद्दल सविस्तरपणे लिहिणारच आहे.

(PRAHAAR)