वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या अमेरिकन लोकांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. तेथील सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ७ लाख लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्यांची संख्या ३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. शिवाय ८ हजारांपेक्षा अधिक जणांचा बळीही गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथेही काही प्रमाणात बंदी लागू असल्याने अर्थव्यवस्थेला धक्का बसू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना नारळ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.
अमेरिकेच्या कामगार खात्याच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात ७ लाक १ हजार लोकांचा रोजगार गेला आहे. शिवाय बेरोजगारीचा दरही ४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एवढेच नाही तर अद्याप कोरोना व्हायरसमुळे फटका बसलेल्यांची पूर्ण आकडेवारी यात समाविष्ट करणे बाकी आहे. ती झाल्यास बेरोजगारांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.