X Close
X
9819022904

कोरोना ‘इफेक्ट’, ऑलिम्पिक पात्रता फेरी रद्द


Coronavirus-5567828012020082756

नवी दिल्ली/कोलकाता : चीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसत आहे. भारताच्या तिरंदाजी संघाने बँकॉकमध्ये होणा-या आशिया चषकातून माघार घेतली आहे. राजधानीत होणारी नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. टोक्योमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीही रद्द करण्यात आली आहे.

भारताच्या तिरंदाजी महासंघाने (एएआय) कोरोनाच्या भीतीमुळे बँकॉक (थायलंड) येथे रंगणा-या आशिया चषक जागतिक क्रमवारी स्पर्धेतून संघ माघारी घेतला आहे. थायलंडमध्ये ८ ते १५ मार्चदरम्यान ही स्पर्धा होणार होती. पाच महिन्यांच्या बंदीनंतरची भारताची ही पहिली स्पर्धा होती. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देताना स्पर्धेत माघार घेण्याचे ठरवले आहे,’ असे एएआयचे महासचिव गुंजन अबरोल यांनी पत्राद्वारे जागतिक तिरंदाजी महासंघाला कळवले आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघातर्फे (आयएसएसएफ) येत्या १५ ते २५ मार्च २०२० या कालावधीमध्ये डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर नेमबाजी वर्ल्डकप होणार होता. भारतीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) विनंतीवरून आंतरराष्ट्रीय संघटनेने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत चीनसह इटली, दक्षिण कोरिया, जपान आणि इराणचे नेमबाज सहभागी होणार होते. मात्र या देशांमध्ये सध्या कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात आहे.

पुढे ढकलण्यात आलेला नेमबाजी विश्वचषक टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी दोन टप्प्यात होणार असल्याचे आयएसएसएफच्या पत्रकात म्हटले आहे. नेमबाजी वर्ल्डकपमधील रायफल आणि पिस्तोल प्रकारातील स्पर्धा ५ ते १२ मे २०२० तसेच शॉटगन प्रकारातील स्पर्धा २ ते ९ जून २०२० दरम्यान होतील.

आयपीएलवरही अनिश्चिततेचे सावट!
कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. परदेशी क्रिकेटपटूंच्या सहभागाबाबत साशंकता असल्याने फ्रँचायझींनी सावध पवित्रा अवलंबला आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच आयपीएल स्पर्धा होईल, असा विश्वास संयोजकांना वाटतो. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती कोणत्याही परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी आग्रही असली तरी आयपीएल त्या तुलनेत फारच छोटी स्पर्धा आहे. त्यामुळे आयपीएलच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे बीसीसीआयच्या पदाधिका-याने सांगितले. ‘प्रत्येक सामन्याचा वैयक्तिकपणे विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच कोणत्याही फ्रँचायझीचे नुकसान होणार नाही. पण, कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास, संपूर्ण आयपीएल रद्द करण्याचा प्रश्नच नाही, असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ यांनी सांगितले.

यंदा आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. सहभागी होणा-या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नसला तरी कोरोनाच्या प्रभावावर सर्वकाही अवलंबून आहे.

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू कोरोनाबाबतची माहिती देणार
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून आयपीएलमध्ये सहभागी होणा-या न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट मंडळ भारतातील अद्ययावत माहिती पुरवणार आहे. न्यूझीलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांशी आम्ही संपर्कात असून जगभरातील घडामोडींची माहिती क्रिकेटपटूंपर्यंत पुरवण्यात येईल, असे न्यूझीलंड बोर्डाच्या रिचर्ड बुक यांनी सांगितले.

(PRAHAAR)