X Close
X
9819022904

कोकणच्या वाढत्या पर्यटनाला कोरोनाचा ब्रेक


Corona-778DS04102020113824

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरणार असेल, तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार जगभर ज्या पद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली कोकणची किनारपट्टी ओस पडली आहे. धार्मिक स्थळं बंद असल्यानं तीर्थक्षेत्रावर आधारलेली अर्थव्यवस्थादेखील संकटात आहे. पुढचे किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका आहे.

दुस-या महायुद्धानंतर पर्यटन क्षेत्रावर नामुष्की आली होती. ज्यात आर्थिक ताण सहन करणा-या चित्रांमध्ये सर्वात पुढे पर्यटन व्यवसायाचा क्रमांक आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णत: कमी झाला असून त्याचा थेट फटका कोकणातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

गेल्या काही वर्षांत कोकणात अनेक पर्यटक येत आहेत. त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०१९ ला कोकणात पर्यटकांची शेवटची गर्दी पाहण्यात आली. त्यानंतर ही गर्दी कमी होत गेली व कोकणातील पर्यटन व्यवसायाला ओहोटी लागली. कोरोनाच्या सावटामुळे गेले आठ महिने कोकणचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हॉटेल व्यावसायिक, शीतपेये, लॉजिंग व्यवसायाबरोबर स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, मच्छीमार व्यावसायिक या सर्वांनाच मंदीचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर हॉटेलमधील कामगारांची कपात करण्यात आली आहे. व्यवस्थापनाला कामगार कपात करण्याची वेळ येऊ नये असे वाटत होते, पण पर्याय नव्हता. कामगार कपात तर ऐंशी टक्क्यांवर गेली. आजही पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवलेली दिसते. हे असेच चालू राहिले, तर अनेक हॉटेल व रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ मालकांवर येणार आहे. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्र सर्वाधिक बाधित झाले आहे. तसं बघायला गेले, तर सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून विरंगुळा म्हणून पर्यटन करीत असतात. विविध ठिकाणी जाणे, राहणे, जेवणे, नवीन पर्यटनाचा आनंद घेणे हे त्यांच्या मनाला आनंद देऊन जाते. पण कोरोनाच्या सावटामुळे याला मोठा ब्रेक लागला आहे. जगभर आणि देशभर फिरणारा पर्यटक आज घरातच राहिला आहे. सर्व व्यक्तीच्या खिशाला चाप लागल्यामुळे भ्रमंती मर्यादित झाली आहे. अशावेळी करोडो रुपयांचे नुकसान सहन करणा-या या क्षेत्रावर मोठे संकट येऊन उभे राहिले आहे. भविष्यात हे क्षेत्र पुढे सरकेल का, हा मोठा प्रश्न आहे. विविध पर्यटनस्थळी पर्यटकांवर अवलंबून असणारे टॅक्सी व्यावसायिक, अन्य सेवा देणारे व्यावसायिक, छोटे-मोठे विक्रेते या सर्वांची रोजी- रोटी बंद झाली. करोनाची साखळी तोडण्यासाठीच्या प्रयत्नांना कितपत यश आले हे लवकरच समजेल; पण यामुळे पर्यटन व्यवसायातील ही रोजगार साखळी नक्कीच विस्कळीत झाली.

गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले होते. उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले होते. मात्र ऐन मोसमातच कोकणातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. कोकणात येणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कोकणातील असंख्य भूमिपुत्रांनी

कोकणच्या विविध भागांत निवासी न्याहारी योजनेबरोबरच छोट्या-मोठ्या रिसॉर्टची उभारणी केली. त्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्जेही घेतली, पण कोरोना व्हायरसमुळे सगळेच ठप्प झाल्याने आज या व्यवसायावर उपासमारीची पाळी आली आहे. लॉकडाऊन, सीमाबंदी आणि आर्थिक मंदी यांचा सर्वाधिक फटका या व्यवसायाला बसला आहे. आज काही प्रमाणात गाडी रुळावर येते, असे वाटत असले, तरी कोरोनामुळे बसलेली प्रवासाची धास्ती दूर झाल्याशिवाय पर्यटनव्यवसाय रुळावर येणार नाही. मार्च, एप्रिल, मे हा पर्यटन व्यवसायासाठी सर्वात मोठा सीझन असतो. या काळात सर्वाधिक बुकिंग होतात. यामध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल, रेस्टॉरंट, गाईड, दुकानदार असे अनेक जण असतात. या सगळ्यांच्याच रोजगारावर कु-हाड आली आहे.

वर्षा ऋतूच्या काळात कोकणात वर्षा पर्यटनावर बंदी आली. सिंधुदुर्गातील आंबोली, नापणे, माटणे, शिवडाव येथे निसर्गसौंदर्याचं दर्शन आणि धबधब्याखाली

मौजमजा करण्यासाठी लाखो पर्यटक येतात; पण यंदाच्या मोसमात माझा पर्यटक कुठे आहे? अशी जणू हाक देऊन सुनी-सुनी झालेली ही ठिकाणे पर्यटकांना खुणावत होती. कोरोनाच्या काळात कोकणावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथे राज्यासह देश-

परदेशातून येणा-या पर्यटकांसाठी या किनारपट्टीवरील सर्वप्रकारचे जल क्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार, किल्लादर्शन, स्कुबा ड्रायव्हिंग, पॅरासेलिंग, स्नॉर्कलिंग यांचे खूप आकर्षण असते. लाखो पर्यटक मालवण आणि देवगड येथे आज आकर्षिले गेल्याने इथल्या स्थानिक मच्छीमारांनी या वित्तीय संस्थांची कर्ज घेऊन लाखोंची गुंतवणूक केली; पण कोरोनाच्या सावटामुळे या सागरी पर्यटनाला ब्रेक लागल्याने इथल्या स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली.

पर्यटन, धार्मिक उत्सव, वारी यांवर बंदी असल्यामुळे घाटावरून कोकणात येणारे भाविक आणि पर्यटकांमार्फत येणा-या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कोकण रेल्वेवर प्रवासी वाहतूक ठप्प असल्यामुळे रेल्वेशी संबंधित सर्व सेवांना थेट व छुपा फटका पुढची काही वर्षे बसेल. महाराष्ट्र राज्याचा विचार केला, तर अलिबाग, मुरुड-जंजिरा, रत्नागिरी, गणपतीपुळे, मार्लेश्वर, तारकर्ली, देवबाग, मालवण, ही कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. पण या पर्यटन स्थळांना करोनामुळे कुणीही भेट दिलेली नाही आणि त्यामुळे या ठिकाणच्या व्यवसाय करणा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलवर दर्शनी भागात लाल रंगाचा झेंडा लावून लाल बावटा आंदोलन केले. कोरोना काळात सर्वाधिक भरडल्या गेलेल्या हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांनी अनेकवेळा आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शहरातून, गावाकडून येणारे चाकरमान्यांचे लोंढे, आंब्यासारख्या नगदी पिकाचे झालेले नुकसान, मासेमारीवर झालेले नकारात्मक परिणाम आणि उन्हाळी सुट्टीतील कोट्यवधींच्या कोकण पर्यटन उद्योगाला बसलेला फटका असे अनेक प्रश्न आज कोकणाकडे आ वासून उभे आहेत. कोकणचे भौगोलिक स्थान मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या भूमीचा वापर नेहमीच मुंबईच्या विस्तारासाठी होत राहिलेला दिसतो.

कोकणातील गावरहाटीवरही या साथीमुळे परिणाम झालेला दिसतो. इथल्या लोककला हा पर्यटनाचाच एक भाग आहे. इथल्या लोककला, गोंधळ, दशावतार, खेळे, नमन, पालखी नृत्य, कीर्तन आणि स्थानिक जत्रा हा कोकणातल्या पारंपरिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग आहे. नियमित भरणा-या यात्रा, उत्सव, लग्न आणि अन्य सण विधींना बंदी आल्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक तसेच यावर संपूर्ण वर्षाचे गणित अवलंबून असणा-या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिमगा, रामनवमी, गणपती या काळातच बंदी असल्याने यानिमित्ताने आर्थिक उलाढालीवर बंदी आली. या सर्वांमुळेच कोकणच्या सांस्कृतिक र्थकारणावर गदा आली. करोना संसर्गाने मानवजातीपुढे दहशत निर्माण केली आहे. त्याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर काही काळ राहणार आहे. याचाच फटका पर्यटन व्यवसायाला पुढील काही काळ सोसावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येकजण बचत, काटकसरीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी पर्यटकांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. पर्यटन उद्योगावरचे कर, वीज बिल यामध्ये सवलत कोकणवासीयांना अपेक्षित आहे. कोरोना विषाणूसोबत सर्वांना जगावे लागणार आहे. या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाताना कोकणातही बदल होत आहेत. कोरोनापासून पळून गावात आलेले चाकरमानी आता गावातले झाले आहेत. त्याच्यापुढे नोकरीची चिंता उभी आहे. काहींनी शेतामध्ये मेहनत सुरू केली आहे. हे बदललेले चित्र अद्याप स्पष्ट करणारी आकडेवारी हातात नाही.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

(PRAHAAR)