X Close
X
9819022904

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील उद्योजक: आनंद माहूरकर


Mumbai:

रोहन राऊळ

मराठी माणूस उद्योगात मागे आहे, असं हिणवलं जातं. पण त्याचवेळी अनेक मराठी माणसांनी देशाटन करून आपलं उद्योगसाम्राज्य देशविदेशात फोफावत नेलं आहे, याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होतं. मराठी मुलखाची ध्वजा परदेशात नेणा-यांपैकी आनंद माहूरकर हे एक महत्त्वाचं नाव. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या विलक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या उद्यमशीलतेची पाडलेली छाप वाखाणण्याजोगी आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रात जगभर प्रसिद्धी मिळवलेले मराठी उद्योजक आनंद माहूरकर यांच्या ‘फाईन्ड अ‍ॅबिलिटी सायन्ससेस’ या कंपनीशी ‘सॉफ्टबँक’ या जपानी कंपनीने करार करीत ५० कोटींची गुंतवणूक केली. जपानसारख्या उद्योगी आणि कामात चोख असणा-या देशातील कंपनीने महाराष्ट्रातील कंपनीशी करार करण्यास राजी व्हावं, ही माहूरकर यांनी मारलेली बाजी आहे.

आनंद माहूरकर यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण अंबेजोगाईत पार पडल्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकलची पदवी घेतली. त्यानंतर भारत फोर्ज, व्हीडिओकॉन यांसारख्या कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते अमेरिकेत बोस्टनला गेले. तेथे ते एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी काम करू लागले. आपल्या परिश्रमाने त्यांनी या कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरून तब्बल साडेतीनशे कोटींवर नेला. अगदी नवीन ब्रँड असणा-या कंपनीचा व्यवसाय आपण इतका वाढवू शकतो, तर आपण आपलीच कंपनी का काढू नये, असा विचार त्यांच्या मनात डोकावला. तो विचार प्रत्यक्षात आकाराला आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि सर्वप्रथम ‘फाइन्ड अ‍ॅबिलिटी सायन्ससेस’ नावाची स्वत:ची कंपनी बोस्टन येथे सुरू केली.

आपल्या या कंपनीविषयी ते सांगतात : माझी कंपनी मी स्वत:च्या पायावर उभी केली. त्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. जिद्द, चिकाटी आणि क्षमता असली की आपण काहीही करू शकतो, हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आल्यावर आपल्या भारताचं एकही उत्पादन या क्षेत्रात नसल्याचं माझ्या लक्षात आलं. आपल्या भारतीय कंपन्या केवळ सेवा पुरविण्याचं काम करतात. त्यामुळे मी माझं स्वत:चं उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मी ‘आर्टिफिशीअल इंटेलिजन्स’ क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात माहूरकर यांच्या ‘फाइन्ड अ‍ॅबिलिटी सायन्ससेस’ कंपनीने नाव कमावलं आहे. अमेरिका, जपान आणि युरोपमधल्या कंपन्यांसह भारतातील विविध क्षेत्रातील बडय़ा कंपन्या फाईन्डअ‍ॅबिलिटी सायन्ससेसच्या सेवा घेत आहेत. मानवी बुद्धीला असणा-या मर्यादा ओलांडण्याचं काम माहूरकर यांची कंपनी करते. जगभरात घडणा-या घडामोडी आणि मार्केटचे विेषण करून ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना अचूक सल्ला देते. अंदाज अथवा आडाखे नव्हे तर अचूक विश्लेषणावर आधारीतच त्यांचं काम चालतं.

अमेरिकेत त्यांच्या कंपनीचं काम अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. मात्र त्याकाळी आपण केवळ आठशे रुपयांत आपलं चार वर्षाचं अभियांत्रिकीचं शिक्षण औरंगाबादमधून पूर्ण केलं. त्यामुळे या समाजाचं आपण देणं लागतो, ही भावना त्यांना येथे काम करण्यास अधिक प्रेरणा देते. याच प्रेरणेतून त्यांनी औरंगाबाद येथे दहा वर्षापासून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. पुणे-मुंबईसारखी समांतर आर्थिक क्षेत्रं अन्य शहरात तयार झाली, तर आपोआप त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊन पुणे-मुंबई शहरांवरील ताण कमी होईल. परिणामी राज्यातील सर्व क्षेत्रांचा समतोल विकास होईल, असं त्यांना वाटतं.

‘मी औरंगाबाद येथून काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी सर्वच माझी खिल्ली उडवत होते; परंतु संगणक आणि चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यास आपण कुठूनही काम करू शकतो, हे मी व माझ्या सहका-यांनी सिद्ध केले आहे. आज औरंगाबादसारख्या शहरात माझे सुसज्ज असे कार्यालय आहे. भारतात खूप मोठे बौद्धिक सामर्थ्य आहे. गरज आहे ती केवळ या युवकांजवळ असणा-या बौद्धिक सामर्थ्यांला चालना देण्याची. माझ्या कंपनीच्या माध्यमातून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे,’ असं ते सांगतात.

‘फाइन्ड अ‍ॅबिलिटी सायन्ससेस’ या कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामाबाबत सांगायचं झालं तर ते सोशल मीडिया अकाउंट, कॉल रेकॉर्डिग ई-मेल, सार्वजनिक वर्तन, आवड या बाबींचे विेषण करतात. कोणत्याही कंपनीला त्यांचे ग्राहक शोधण्यासाठी तसंच ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मानवी बुद्धीला मर्यादा असतात, त्या भेदून काम करण्याचं कसब या तंत्रज्ञानात आहे. याचा उपयोग मानवाचे आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी होऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीला कोणते कपडे, फॅशन सूट होईल, कोणती हेअर स्टाईल चांगली दिसेल याचीही माहिती देता येते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरणा-या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती याचा वापर आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी करतात. या क्षेत्राला चांगले भविष्य आहे. मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी हे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी जोखीम पत्करून पुढे येण्याची गरज आहे. धाडस केल्याशिवाय हाती काही लागत नसते. फक्त आपल्यातील न्यूनगंड काढून पुढे यावे, असं आवाहनही ते करतात. ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणं,’ हे माहूरकर यांनी आपल्या कृतीने सिद्ध केलं आहे.

E-mail : rohanrawool25@gmail.com