X Close
X
9819022904

काँग्रेस आघाडीचे जागावाटप निश्चित


Congress-NCP-1

पिंपरी : विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी १२५ जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाजनादेशयात्रा, शिवस्वराज्य यात्रा, जनआशीर्वाद अशा विविध यात्रांचे आयोजन करून पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वाना पडलेला आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने जागावाटप निश्चित केले आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. या जागांमधील ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून काँग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, ५ ते ६ जागा ज्या काँग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याचप्रमाणे उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(PRAHAAR)