X Close
X
9819022904

कसबा पोटनिवडणूक: महाविकास आघाडीत फूट? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले शिवसेनेनेच…


Mumbai:

मुंबई: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष असलेले हेमंत रासने हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०१४ मध्ये कसबा पेठ जागा काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र ज्यावेळी सेनेनी ही जागा लढवली होती. त्यावेळी सेनेला ६५ हजार मतं मिळाली होतीय त्यामुळे सेनेला आम्ही विनंती केली आहे की, तुम्ही दोन्हीही जागा लढा. कारण कसब्याची जागा काँग्रेस कायम हरत आली आहे. मात्र तिथे सेनेचा बोलबाला आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची नाही. त्यामुळे आम्ही सेनेला दोन्ही जागा लढण्याची विनंती केली आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहूयात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन ठरवू, असं म्हटलं जात असतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सहयोगी पक्ष वंचितकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिवसेनेला फूस लावत असल्याचं म्हटलं जात आहे.