ओय परशा, आर्ची पास झाली रं!
पुणे : ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने सिनेसृष्टीला ‘याड’ लावले होते. बॉक्स ऑफिसवर ‘झिंगाट’ कामगिरी करत हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. त्यातील आर्ची आणि परश्याची जोडी तर ‘सुपरडुपर हिट’ झाली. ‘आर्ची’ रिंकू राजगुरुने बारावीत ८२ टक्के गुण मिळवले आहेत. तिने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. दहावीत रिंकू ६६.१० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. रिंकूने सोलापुरातील टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील केंद्रातून परीक्षा दिली आहे. परीक्षेच्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सैराट, कागर चित्रपटानंतर आता आर्चीचा मेकअप हा चित्रपट येणार आहे. (PRAHAAR)